
गोंधळलेला आणि द्विधा मनःस्थितीत असलेला पाकिस्तान खेळणार नसेल, तर आम्ही तयार आहोत! पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) अनिश्चिततेवर आइसलँड क्रिकेटने टाकलेला हा उपरोधिक टोला सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात हशाचा विषय ठरत आहे. टी-20 विश्वचषकाबाबत पाकिस्तानचा गोंधळ इतका वाढला आहे की, आता थेट आइसलँडसारखा देशही सोशल मीडियावरून त्याची खिल्ली उडवू लागला आहे.
आइसलँडची थंड अन् टोचणारी प्रतिक्रिया
पाकिस्तानच्या संभाव्य बहिष्काराच्या चर्चांवर आइसलँड क्रिकेटने ‘एक्स’वर मिश्किल प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानने माघार घेतली, तर आम्ही जागा भरण्यास तयार आहोत,’ असे म्हणत त्यांनी पीसीबीची अक्षरशः फिरकी उडवली. इतकेच नव्हे, तर 2 फेब्रुवारीपर्यंत कळवले तर तिकीट काढता येईल, पण 7 फेब्रुवारीला थेट कोलंबो गाठणे म्हणजे ‘लॉजिस्टिकल भयानक स्वप्न’ ठरेल, असा टोमणाही त्यांनी मारला.
फ्लाइट तिकीट आणि सलामीवीराची झोप
आइसलँड क्रिकेटने केफ्लाविक ते कोलंबो प्रवासाचा स्क्रीनशॉट शेअर करत या टोमण्याला अधिक रंगत आणली. अचानक बोलावल्यास आपल्या सलामीवीराची झोप उडेल, असे म्हणत त्यांनी पीसीबीच्या निर्णयक्षमतेवर मिश्किल बाण सोडले. या पोस्टने सोशल मीडियावर चांगलाच हशा पिकवला. पीसीबीकडून कधी बहिष्काराची भाषा, कधी सरकारकडे पाहण्याचा सूर, तर कधी ‘सगळे पर्याय खुले’ अशी विधाने केली जात आहेत. संघ जाहीर झाला आहे, तयारी सुरू आहे, पण खेळायचे की नाही यावर मात्र अजूनही ठोस भूमिका त्यांना घेता आलेली नाही.




























































