>> द्वारकानाथ संझगिरी
‘मेरे पास माँ है’. ‘दीवार’ चित्रपटात शशी कपूर छाती फुगवून अमिताभला सांगतो. त्याच आविर्भावात रोहित शर्मा क्रिकेट जगाला ओरडून सांगू शकतो, ‘मेरे पास जसप्रीत बुमरा है.’ ‘बुमरा है तो मुमकिन है’ ही अतिशयोक्ती नाही. हे सत्य त्याने मनगटाच्या जोरावर अनेकदा दाखवलंय. मग ते कसोटी क्रिकेट असो, वन डे किंवा टी-20.
काल बुमराने विजयाचं कठीण गणित रँगलरच्या प्रतिभेने सोडवलं आहे. न्यूयॉर्कला त्याने काल तेच केलं. खेळपट्टी नितीश कुमारपेक्षा लहरी होती. वेगवान गोलंदाजांचा चेंडू कधी खाली राहायचा, कधी उसळी घ्यायचा, कधी अपेक्षेपेक्षा हळू यायचा, कधी स्विंग व्हायचा. त्यात वातावरण ढगाळ होतं. पण तरीही 120 चेंडूंत 120 धावा हे टार्गेट फार कठीण नव्हतं. किंबहुना पाकिस्तानची जिंकण्याची शक्यता 85 टक्के, तर हिंदुस्थानची फक्त 15 टक्के दाखवली जात होती. 14व्या षटकात पाकिस्तानची धावसंख्या होती 3 बाद 80 होती. डोक्यात वीज चमकल्याप्रमाणे रोहितने बुमराला आणलं. त्याने रिझवानची विकेट काढली. रिझवान आत येणाऱया स्विंगवर खोल टप्प्याच्या चेंडूला आडवा खेळला. त्याआधी हार्दिक पंडय़ाने फखरची विकेट घेतली होती. रिझवान गेल्यावर पाकिस्तानी फलंदाजी दबावाखाली आली. 13 ते 17 या षटकांत हिंदुस्थानने 18 धावा देऊन 3 विकेट टिपल्या.
तरीही 19 व्या षटकाच्या सुरुवातीला पाकिस्तानला जिंकण्याची संधी 63 टक्के दिली होती. बुमराच्या षटकात ती 18 टक्क्यांवर आली. शेवटच्या षटकात पाकिस्तानला जिंकायला 18 धावा हव्या होत्या. ते त्यांच्या ताकदीच्या पलीकडे होत्या. बुमराने 24 चेंडूंत फक्त 14 धावा देऊन 3 महत्त्वाच्या विकेटस्, त्यासुद्धा योग्य टप्प्यावर घेतल्या. 15 निर्धाव चेंडू टाकले. त्यात जादू नव्हती. अचूक टप्पा आणि दिशा, वेग आणि अधूनमधून हळू सोडलेले चेंडू. खेळपट्टीला कसं वश करायचं हे त्याच्याइतपं कुणालाच जमत नाही.
तो तेंडुलकर, द्रविड, सेहवाग, गांगुली, लक्ष्मण यांच्या काळात हिंदुस्थानी संघात असता तर त्या संघाने हिंदुस्थानबाहेर कितीतरी जास्त सामने जिंकले असते. दुर्दैवाने विराट किंवा रोहितचं वलय त्याला अजून मिळालेलं नाही. गोलंदाज त्या बाबतीत कमनशिबीच असतात.
बुमराला अक्षर पटेल आणि हार्दिक पंडय़ाने चांगली साथ दिली. या न्यूयॉर्कच्या नवख्या खेळपट्टीवर पंडय़ाचा किंचित आखूड टप्पा उपयुक्त ठरतोय.
पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांनी खेळपट्टी आणि वातावरण याचा चांगला फायदा उठवला. विराटला आघाडीला पाठवण्याचा डावपेच अजून या स्पर्धेत यशस्वी ठरलेला नाही. त्याला चेंडू थांबून आला. पण ही या खेळपट्टीची खासियत आहे. फक्त 3 हिंदुस्थानी फलंदाजांनी एकेरी धावसंख्या ओलांडली. त्यात पंतने 31 चेंडूत चाळीशी ओलांडली. पण नशीब त्याच्या फलंदाजीच्या रथाचं सारथ्य करत होते. ते त्याच्या साहसावर खूश होते. ‘जाते थे जापान पहुंच गये चीन’ असं त्याच्या फटक्यांच्या बाबतीत अनेकदा झालं.
अक्षरला फलंदाजीसाठी वर पाठवायचा डावपेच धावसंख्येचा विचार केला तर यशस्वी ठरला, पण खाली हिंदुस्थानी संघ कोसळला. मात्र बुमराच्या गोलंदाजीला 119 धावांचं मलमली चिलखतसुद्धा पुरलं. त्याने मॅच फिरवली.