जय महाराजा! दक्षिण आफ्रिकेचा पुन्हा थरारक विजय

दक्षिण आफ्रिकेच्या हातून सामना जवळजवळ निसटला होता. बांगलादेशला 18 चेंडूंत 20 धावांची गरज होती आणि त्यांचे सहा फलंदाजही शिल्लक होते. पण तेव्हाच कगिसो रबाडा आणि ओटनिल बार्टमनने टाकलेली षटके, मग शेवटच्या षटकांत केशव महाराजने बांगलादेशचे दोन विकेट घेत सामन्यात मारलेल्या मुसंडीमुळे दक्षिण आफ्रेकेने आणखी एक सामना शेवटच्या क्षणी जिंकत विजयाची हॅटट्रिक साजरी केली. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेच्या सुपर एट प्रवेशाच्या आशा आणखीन बळकट झाल्या आहेत. ड गटात बांगलादेश, नेदरलॅण्डस् आणि नेपाळ या तिन्ही संघांना सहा गुण करण्याची संधी असल्यामुळे आफ्रिका सलग तीन विजय नोंदवूनही सुपर एटमध्ये पोहोचू शकलेला नाही.

महाराजने सामना फिरवला

दक्षिण आफ्रिकेला 113 धावांवर रोखल्यावर विजय बांगलादेशच्या आवाक्यात वाटत होता. रबाडा, नॉर्किया आणि महाराजने 50 धावांत 4 फलंदाज टिपत बांगलादेशलाही अडचणीत आणले होते. पण त्यानंतर तौहिद हृदॉय आणि महमुदुल्लाहने 44 धावांची भागी रचून बांगलादेशला विजयासमीप नेले होते, पण शेवटच्या तीन षटकांत 20 धावांची गरज असताना बांगलादेशने विजयाची संधी गमावली. शेवटच्या षटकांत बांगलादेशला विजयासाठी केवळ 11 धावा हव्या होत्या, पण महाराजने महमदुल्लाह आणि जाकेर अलीला बाद करत बांगलादेशवर 4 धावांनी विजय मिळवून दिला. 46 धावांची जिगरबाज खेळी करणारा क्लासन सामनावीर ठरला.

क्लासन-मिलरचा जिगरी खेळ

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांना घातक ठरला. बांगलादेशच्या तंझिम हसन सकीबने सलग तीन षटकांत 3 विकेट टिपत आफ्रिकेची 4 बाद 23 अशी बिकट अवस्था केली होती. पण त्यानंतर हेन्रिक क्लासन आणि डेव्हिड मिलरने पाचव्या विकेटसाठी केलेल्या 79 धावांच्या झुंजार आणि विक्रमी भागीने आफ्रिकेला शंभरी ओलांडून दिली होती. क्लासनने 46 तर मिलरने 29 धावांची संयमी खेळी करत बांगलादेशच्या गोलंदाजांना थोपवले होते. पण ही जोडी फुटताच आफ्रिकेच्या धावाही मंदावल्या. शेवटच्या 15 चेंडूंत त्यांना 11 धावाच करता आल्या.