श्रीलंकेचा विजयी शेवट, नेदरलॅण्ड्स साखळीतच बाद

 सलग तीन पराभवांमुळे साखळीतच गारद झालेल्या श्रीलंकन संघाने अखेर आपला शेवट गोड करताना नेदरलॅण्ड्सचा 83 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे नेदरलॅण्ड्सच्या सुपर एट प्रवेशाच्या स्वप्नांनाही सुरुंग लावला.

गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्या षटकात सलामीवीर बाद होण्याची परंपरा या साखळी सामन्यातही राहिली. पथुम निस्सांका शून्यावर बाद झाला. पण त्यानंतर कुसल मेंडिस (46), धनंजया डिसिल्व्हा (34), चरिथ असलंका (46) आणि अँजेलो मॅथ्यूज (ना. 30) यांच्या घणाघाती खेळींनी श्रीलंकेला 201 धावांपर्यंत नेले. या वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्येची त्यांनी आज बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध 7 बाद 201 अशी दमदार मजल मारली होती तर श्रीलंकेने 6 बाद 201 अशी धावसंख्या उभारली. यंदा केवळ दोनच संघांना धावांचे द्विशतक गाठता आले.

अर्धशतकाविना धावांचे द्विशतक

श्रीलंकेने 201 धावांचा डोंगर उभारला असला तरी या डावात त्यांच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकही गाठता आले नाही. एवढेच नव्हे तर, या डावात श्रीलंकेच्या एकाही जोडीने अर्धशतकी भागी रचली नाही. कुसल मेंडिस आणि धनंजया डिसिल्व्हा यांनी तिसऱया विकेटसाठी 45 धावांची भागी रचली. हीच या डावातील सर्वोच्च भागी ठरली. दुसरीकडे नेदरलॅण्ड्सचा डाव 118 धावांत आटोपला असला तरी मायकल लेविट (31) आणि मॅक्स ओडाऊड यांनी 4.3 षटकांत 45 धावांची सलामी दिली. पण ही जोडी फुटताच त्यांच्या डावालाही घसरण लागली. मधल्या फळीत कर्णधार स्कॉट एडवर्डस्ने 31 धावा केल्या. त्यामुळे ते शतकी टप्पा गाठू शकले. नुवान तुषाराने 24 धावांत 3 विकेट टिपले तर 21 चेंडूंत 5 षटकारांची आतषबाजी करणारा चरिथ असलांका श्रीलंकेच्या सुखद शेवटाचा मानकरी ठरला.