T20 विश्वचषक 2024 चा 11 वा सामना 6 जून रोजी अमेरिका आणि पाकिस्तान या दोन संघामध्ये पार पडला. डलासमधील ग्रँड प्रेयरी मैदानावर खेळवण्यात आलेल्या या रोमांचकारी सामन्यात T20 World Cup 2024 ची पहिली सुपर ओव्हर खेळवण्यात आली. या सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने पाकिस्तानला धुळ चारत स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली. या विजयामुळे अमेरिका ग्रुप ए मध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान झाली.
अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात अमेरिकेचा मराठमोळा गोलंदाज सौरभ नेत्रावळकरने शानदार गोलंदाजी केली. सौरभ नेत्रावळकरने पाकिस्तानच्या पहिल्या डावात 4.50 च्या सरासरीने 18 धावांत 2 बळी घेतले. यानंतर, सुपर ओव्हरमध्येही त्याने 9 च्या सरासरीने 9 धावा देत पाकिस्तानचा एक खेळाडू बाद केला. सौरभची हिच शानदार खेळी पाहून सूर्यकुमार यादवने इंस्टाग्रामवर एक खास स्टोरी पोस्ट केली आहे.
सूर्यकुमार यादवने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सौरभचा आणि हरमीत सिंग यांचा कालच्या सामन्यातील एक फोटो टाकला आहे. सोबतच त्या दोन्ही खेळाडूंना टॅग करत एक छोटा संदेश दिला आहे. सूर्यकुमारने लिहिले की, “हरमीत सिंग पाजी आराम से…#जादू”. यानंतर त्यांनी मराठीत लिहिलं की, ‘सौरभ नेत्रावळकर तुला मानला भाऊ’. ‘तुमच्यासाठी मी खूप आनंदी आहे’, असे सूर्यकुमारने त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
कोण आहे सौरभ नेत्रावळकर
सौरभ नेत्रावळकर हा हिंदुस्थानी वंशाचा अमेरिकन क्रिकेटपटू आहे. सौरभ मुळचा मुंबईचा असून तो पेशाने इंजिनिअर आहे. सौरभ हा हिंदुस्थानच्या 2010 मध्ये झालेल्या 19 वर्षाखालील वर्ल्डकप संघाचा भाग होता. यानंतर मुंबईकडून रणजी ट्रॉफीही तो खेळला आहे. मात्र आता सौरभ अमेरिकेकडून क्रिकेट खेळतो. आत्तापर्यंत सौरभ नेत्रावळकरने अमेरिकेसाठी 77 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या 77 सामन्यांमध्ये त्याने 4.45 च्या सरासरीने 102 विकेट घेतल्या आहेत.