अवघ्या जगावर राज्य करणाऱ्या महासत्ता अमेरिकेवर राज्य करण्यासाठी क्रिकेट सज्ज झाले आहे. प्रथमच टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन अमेरिकेत केले जात असून या टी-20 वर्ल्ड वॉरमध्ये 20 देश आपली ताकद पणाला लावतील. 28 दिवस रंगणाऱ्या या फटकेबाजीच्या खेळाचे अमेरिकेसह पॅरेबियन बेटांवरही आयोजन केले जाणार असून एपंदर 55 सामन्यांच्या खणखणीत मेजवानी क्रिकेटप्रेमींना आस्वाद लुटण्याची संधी मिळेल.
क्रिकेटच्या नभांगणात अमेरिकेचाही समावेश होईल याची पाच वर्षांपूर्वी कुणी कल्पनाही केली नसेल, पण क्रीडा जगतावर वर्चस्व राखणारी अमेरिकाही क्रिकेटच्या वेगवान फॉरमॅटच्या प्रेमात पडली असून ते थेट वर्ल्ड कपचे यजमान बनले आहेत. अमेरिकेत वर्ल्ड कपच्या निमित्ताने तीन क्रिकेट स्टेडियम्सना सामने आयोजनाची संधी लाभली आहे. एकूण 55 सामने खेळविले जाणार असले तरी अमेरिकेत एकूण 18 सामने खेळले जातील.
हिंदुस्थानचे सर्व सामने अमेरिकेत
अमेरिकेतही क्रिकेटला साजेसे वातावरण व्हावे म्हणून या वर्ल्ड कपच्या निमित्ताने क्रिकेटची महासत्ता असलेल्या हिंदुस्थानचे चारही साखळी सामने अमेरिकेत खेळविले जाणार आहेत. त्यापैकी तीन सामने न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी स्टेडियमवर तर एक सामना लाऊडरहिलच्या सेंट्रल ब्रोवार्ड स्टेडियमवर खेळविला जाईल. या चार सामन्यांमुळे अमेरिकेत क्रिकेटचे जोरदार वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतील ब्लॉकब्लस्टर हिंदुस्थान-पाकिस्तान सामना आधीच सोल्ड आऊट झाला आहे. या सामन्यासाठी अवघ्या जगभरातील क्रिकेटप्रेमी न्यूयॉर्क गाठणार आहेत.
धक्कादायक निकालांची अपेक्षा
टी-20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघापैकी निम्मे संघ दुबळे आहेत. मात्र या वेगवान खेळात कोणताही संघ बाजी मारू शकतो. विशेष करून नेपाळ, आयर्लंडसारख्या संघांकडून धक्कादायक निकालांची अपेक्षा आहे. या संघांनी गेल्या काही सामन्यांत जोरदार खेळ केल्यामुळे स्पर्धेत ते अव्वल संघांना धक्का देण्याची क्षमता राखून आहेत.
हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियाच दावेदार
टी-20 वर्ल्ड कपमध्ये कुणाचीही लॉटरी लागू शकते. या अनिश्चिततेच्या खेळात हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया या बलाढय़ संघांनाच जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. तसेच गतविजेता इंग्लंड, यजमान वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान हे संघही संभाव्य विजेत्यांच्या यादीत आहेत.
प्रत्येकी पाच संघ आणि चार गट
गेल्या वर्ल्ड कपपर्यंत टी-20 वर्ल्ड कपमध्ये 16 संघांचा सहभाग होता, मात्र यावेळी तो आकडा 20 पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पाच संघांचे चार गट बनविण्यात आले असून हिंदुस्थानचा संघ ‘अ’ गटात पाकिस्तान, पॅनडा, आयर्लंड आणि अमेरिका या चार संघांशी भिडेल. तसेच ‘ब’ गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नामिबिया, ओमान, स्कॉटलंड; ‘क’ गटात अफगाणिस्तान, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी, वेस्ट इंडीज आणि युगांडा; तर ‘ड’ गटात बांगलादेश, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, नेदरलॅण्डस् आणि श्रीलंका हे संघ आहेत.
टी-20 वर्ल्ड वॉरमध्ये पाकिस्तान सरस
टी-20 वर्ल्ड कपमध्ये जेतेपदाच्या यादीत पाकिस्तान तळाला असला तरी याच संघाने या स्पर्धेवर आपले वर्चस्व वारंवार दाखवले आहे. पहिल्या चार स्पर्धांच्या उपांत्य फेरीत खेळणारा पाकिस्तान हा एकमेव संघ होता. तोच संघ गेल्या आठ स्पर्धांपैकी सहा स्पर्धांच्या अंतिम चार संघांत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. पाकिस्तानने तीन अंतिम फेरीत धडक मारली असली तरी जगज्जेतेपद मात्र एकदाच जिंकता आले आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज हे संघ दोनदा जगज्जेते ठरले आहेत. अंतिम फेरीत पोहोचणारे सर्वच संघ किमान एकदा जगज्जेते ठरलेत. त्याला केवळ न्यूझीलंड हा संघ अपवाद आहे. जो एकदाही जिंकलेला नाही.
अमेरिका, युगांडा आणि कॅनडाचे पदार्पण
टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात प्रथमच 20 संघांना स्थान देण्यात आले आहे. त्यापैकी यजमान अमेरिका, कॅनडा आणि युगांडा हे तीन संघ प्रथमच टी-20 वर्ल्ड कप खेळणार आहेत. एका स्पर्धेत तीन संघ पदार्पण करण्याची ही दुसरीच वेळ आहे. 2014 साली हाँगकाँग, नेपाळ आणि यूएई हे तीन संघ पदार्पणवीर ठरले होते.
एकतर्फी सामन्यांची भीती
स्पर्धेत 20 संघांना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे दिग्गज विरुद्ध नवखे संघांमध्ये होणारे सामने एकतर्फी होण्याची भीती आहे. या सामन्यांमध्ये विश्वविक्रमांचाही मुसळधार आणि संततधार पाऊस पडला जाईल, अशीही शक्यता दिग्गजांनी वर्तवली आहे. संघांच्या वाढत्या संख्येमुळे एकतर्फी आणि कंटाळवाण्या सामन्यांचीही संख्या वाढली तर संघांच्या संख्येवर प्रश्न निर्माण होण्याचीही आयसीसीला भीती आहे.
महत्त्वाचे सामने विंडीजमध्ये
हिंदुस्थानचे सामने अमेरिकेत होणार असले तरी वर्ल्ड कपच्या बहुतांश लढती पॅरेबियन बेटांवरच खेळविल्या जाणार आहेत. पॅरेबियनच्या जमैका, त्रिनिदाद, बार्बाडोस, सेंट विन्सेंट, ऑण्टिग्वा आणि बार्बुडा, गयाना आणि सेंट लुसिया या सात बेटांवरील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या स्टेडियम्सवर 37 सामने खेळले जाणार आहेत.