ताडोबात दिसला काळा बिबट्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विदर्भात चंद्रपूर जिह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांची ख्याती सर्वत्र पोहोचली आहे, मात्र आता ताडोबाची एक नवीन ओळख निर्माण होत आहे. ताडोबामध्ये पर्यटकांना काळ्या बिबट्यांचे दर्शन नियमित व्हायला लागले आहे. पर्यटकांमध्ये या काळय़ा बिबटय़ांबद्दल कुतुहल आणि आकर्षण जास्त आहे. त्यामुळे काळय़ा बिबटय़ांसाठीदेखील ताडोबा ओळखला जाणार आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात राज्यातील सर्वाधिक वाघ आहेत. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरपासून अनेक सेलिब्रिटींना ताडोबातील वाघांनी भुरळ घातली आहे, मात्र आता ताडोबामध्ये काळय़ा म्हणजेच ‘मेलानिस्टिक’ बिबटय़ांची संख्याही वाढत आहे. वन्यजीव छायाचित्रकार रणवीर सिंग गौतम यांनी काळय़ा बिबटय़ा कॅमेऱ्यात कैद केला. ताडोबातील केसलाघाट वनक्षेत्रात शुक्रवारी पर्यटकांना सफारीदरम्यान काळा बिबट दिसला. फुलेझरी टेकडी परिसराजवळ हा बिबट दिसताच पर्यटकांनी त्याचे छायाचित्र घेण्यास सुरुवात केली.

सात काळय़ा बिबट्यांचा संचार

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सुमारे सातपेक्षा अधिक काळे बिबट आहेत. पांगली वनक्षेत्रात सर्वाधिक काळे बिबट आहेत, तर पर्यटन क्षेत्रात सुमारे चार वेगवेगळय़ा बिबटय़ांचे दर्शन झाले आहे. यात एका काळय़ा मादी बिबटय़ासह तिचे दोन बछडे आणि एक नर काळय़ा बिबटय़ाचा समावेश आहे, तर मदनापूर क्षेत्रजवळ एक आणि झरी कोळसाच्या गाभा क्षेत्रात दोन काळे बिबट आहेत, असे रणवीर सिंग गौतम यांनी सांगितले.

2018मध्ये पहिल्यांदाच झाली नोंद

ताडोबामध्ये काळा बिबट 2014 मध्ये कोळसा व मोहर्लीच्या सीमेवरील बोटेझरी भागात ‘कॅमेरा ट्रप’मध्ये आला होता, मात्र पर्यटक किंवा गस्त घालणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना त्याने सतत हुलकावणी दिली होती. मात्र, पर्यटनासाठी आलेल्या एका बेल्जीयम जोडप्याला मे 2018 मध्ये काळा बिबट पहिल्यांदा आढळला होता. त्यामुळे 2018 मधली नोंद ही पहिली ठरली. ताडोबासह पेंच, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातदेखील काळा बिबट दिसला आहे.

बिबट्याचा रंग काळा का होतो?

कालिकण (मेलॅनिन) हे त्वचेतील रंगद्रव्य (पिगमेंट) जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे बिबट काळे दिसतात. बिबटय़ांमधील मेलॅनिझम एका उत्परिवर्तनातून उद्भवते. यामुळे मेलेनीन रंगद्रव्यांची निर्मिती जास्त होते आणि आवरण काळे होते. काळय़ा बिबटय़ांची त्वचा जवळून पाहिली असता नेहमीचे ठिपके दिसतात.