
पाकिस्तानच्या सैन्यावर मोठा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात लेफ्टनंट कर्नल, मेजर यांच्यासह 11 सैनिक ठार झाले आहेत. हा हल्ला खैबर पख्तूनख्वाच्या ओरकजई प्रांतात झाला असून या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानच्या तालिबानने स्वीकारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फितना अल-खवारिज या दहशतवादी गटाच्या उपस्थितीच्या माहितीवर आधारित ओरकजईमधील अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हा हल्ला झाला होता. या दरम्यान बंदी घालण्यात आलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेच्या 19 दहशतवाद्यांचा देखील मृत्यू झाला आहे.
फितना अल-खवारिज हा शब्द पाकिस्तानातील बंदी घालण्यात आलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेसाठी वापरला जातो. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तीव्र चकमक उडाली. पुढे तसेच परिसरात उरलेल्या दहशतवाद्यांना शोधून ठार करण्यासाठी सध्या व्यापक शोध मोहीम राबवली जात आहे.
2025 च्या तिसऱ्या तिमाहीत खैबर पख्तूनख्वा हा देशातील सर्वाधिक हिंसाचारग्रस्त प्रदेश होता. हिंसेशी संबंधित एकूण मृत्यूंपैकी सुमारे 71 टक्के (638) मृत्यू आणि 67 टक्क्यांहून अधिक (221) घटना याच प्रदेशात झाल्या.