
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) स्पष्ट बहुमत मिळवताना दिसत आहे. एकूण १११ जागांच्या या निवडणुकीत भाजप ६६ जागांवर आघाडीवर आहे. तर मिंधे गट ४२ जागांवर आघाडीवर आहे. उर्वरित जागा इतर पक्ष आणि अपक्षांनी पटकावल्या आहेत. यातच आता नवी मुंबईत एकमेकांविरोधात लढणाऱ्या भाजपने शहरात एक पोस्ट लावत मिंधेंना डिवचलं आहे. नवी मुंबईत भाजपने एक पोस्ट लावले असून ज्यामध्ये टांगा पलटी होत असल्याचं चित्र दिसत असून यात एकनाथ शिंदे यांचं चित्रही दिसत आहे.
या निकालाआधी भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी सारमाध्यमांशी बोलत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. ‘भाजपाने परवानगी दिली तर एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करून घोडेपण बेपत्ता करेन”, अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले होते. यानंतर आज शहरात हे पोस्टर झळकल्याने पुन्हा एकदा महायुतीमधील दोन पक्षामधील धुसफूस समोर आली आहे.






























































