
तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीने दिलेल्या पहिल्या अहवालात डॉ. सुश्रुत घैसास यांच्यासह दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला क्लीन चिट दिली होती. मात्र, ससून समितीच्या अहवालावर पोलिसांकडून काही मुद्दय़ांवर अभिप्राय मागवण्यात आला होता. ससून रुग्णालयाच्या समितीने एका दिवसात दुसरा सुधारित अहवाल सादर करून डॉ. घैसास यांच्यावर वैद्यकीय हलगर्जीपणाचा ठपका ठेवला आहे. पहिल्या अहवालात क्लीन चिट देणाऱया समितीचा हा हलगर्जीपणा आहे की, तो मुद्दाम केला गेला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी उपचार नाकारल्यामुळे गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकारावर सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर आरोग्य विभाग, धर्मादाय सहआयुक्त समिती, महापालिकेच्या मातामृत अन्वेषण समितीकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे. ससून रुग्णालयाच्या समितीनेही या प्रकरणात तनिषा भिसे यांना उपचार देताना डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाला आहे का? याची चौकशी केली असून त्याचा अहवाल पुणे पोलिसांना सादर करण्यात आला. ससूनच्या पहिल्या अहवालात दीनानाथ रूग्णालय पिंवा डॉ. घैसास यांच्याबाबत स्पष्ट असा निष्कर्ष मांडला नव्हता.