
कुंभमेळ्यासाठी तपोवनसह नाशिकमध्ये 20 फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करू नये, असे सक्त निर्देश राष्ट्रीय हरीत लवादाने दिले आहेत. नाशिकमधील वृक्षतोडीसंदर्भात सुरू असणारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करता येणार नाही, असे लवादाने स्पष्ट केले आहे.
नाशिकमध्ये तपोवनमधील वृक्षतोडीला वृक्षप्रेमी, नागरिकांनी जोरदार विरोध केल्यामुळे या ठिकाणच्या वृक्षतोडीला दोन आठवडय़ांपूर्वी अंतरिम स्थगिती देण्यात आली होती. मात्र हरीत लवादाच्या आदेशानंतरही झाडे तोडली गेल्याचा मुद्दा याचिकाकर्ते पिंगळे यांनी मांडला होता. तपोवनातील वृक्षतोडीला विरोध होत असतानाच समृद्धी महामार्गाला जोडणाऱया रस्त्याच्या कामासाठी ब्रिटिशकालीन जुन्या वडाच्या फांद्या तोडल्याचे उघड झाले होते.




























































