तारक मेहता

313

>>प्रशांत गौतम

हिंदीतील प्रख्यात साहित्यिक, स्तंभलेखक, नाटककार आणि ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या हिंदी मालिकेचे लोकप्रिय लेखक ‘पद्मश्री’ तारक मेहता यांच्या निधनाने तारक मेहतांचा चाहता परिवार पोरका झाला आहे. 2008 साली सुरू झालेल्या या मालिकेने आजही दर्शकांच्या मनावर गारुड कायम आहे. मालिकेतील जेठालाल नावाचा व्यापारी आपल्या दैनंदिन आयुष्यातील अडचणींवर कशी मात करतो, येणाऱया संकटांना कसा सामोरा जातो आणि त्यांचा मित्र तारक मेहता वेळोवेळी त्यातून कसा बाहेर काढतो याचे उत्तम व रंजक चित्रण या मालिकेमध्ये लेखक करतात. या मुख्य सूत्रावरच मालिकेच्या प्रवासाने बघता बघता 8-9 वर्षे पार केली.

एका गुजराती दैनिकात ‘दुनियाने उँधा चष्मा’ ही विनोदी कादंबरी खूपच लोकप्रिय झाली. प्रबोधनातून मनोरंजन त्यांनी दमदार लेखणीच्या माध्यमातून चित्रवाहिन्यांपर्यंत पोहोचवले. या मालिकांतील लेखनाप्रमाणेच ते विविध राष्ट्रीय दैनिकांचे स्तंभलेखकही होते. साप्ताहिक ‘चित्रलेखा’मधील त्यांच्या लेखनाने स्वतंत्र वाचकवर्ग निर्माण केला.

हिंदी भाषेच्या संवर्धन आणि संगोपनासाठी एक लेखक म्हणून त्यांचे भरीव आणि ठसठशीत योगदान तब्बल 80 पुस्तकांच्या माध्यमातून लाभले. त्यांचे गुजराती वर्तमानपत्रातील स्तंभलेखनही पुस्तकरूपाने आले. त्यांच्या साहित्य कथांचे अनेक भाषांत अनुवाद झाले. तारक मेहतांचा जन्म 26 डिसेंबर 1929 रोजी अहमदाबादमध्ये झाला. 1945 ला दहावी झाल्यानंतर 1956 मध्ये त्यांनी मुंबईच्या खालसा महाविद्यालयात गुजरातीमध्ये बी.ए. केले. त्यानंतर भवन्स महाविद्यालयात एम.ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. 1958-59 या काळात गुजराती नाटय़ मंडळात ते कार्यकारी मंत्री पदावर कार्यरत होते. त्यांच्यातील खरी पत्रकारिता सुरू झाली ती 1960 साली. ‘प्रजातंत्र’ दैनिकात उपसंपादक म्हणून त्यांनी वृत्तपत्रीय कामाचा श्रीगणेशा केला. 1960 ते 1986 या काळात हिंदुस्थान सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयात ते कार्यरत होते. अनेक दिवसांपासून ते आजारी असले तरी त्यांचा मेंदू खूप तल्लख होता. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी रसिकांना व चाहत्यांना हसवत ठेवले.

आपली प्रतिक्रिया द्या