बांगलादेशातील हिंसाचारात ठरवून हिंदूंना लक्ष्य केलं गेलं; विवेक रामास्वामी यांनी व्यक्त केली चिंता

हिंदुस्थानातील नेते, कलाकारांनंतर आता अमेरिकेचे उद्योजक आणि माजी रिपब्लिकन अध्यक्षपदाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांनीही बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचारावर चिंता व्यक्त केली. याबाबत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.

बांगलादेशातील हिंसाचारात हिंदूंवर होणारा अत्याचार चुकीचा आहे. यापूर्वीही बांगलादेशने 1971 मध्ये त्यांच्या स्वातंत्र्यासाठी एक रक्तरंजित युद्ध लढले. यावेळी पाकिस्तानी सैनिकांनी लाखो बांगलादेशी महिलांवर बलात्कार केले. कित्येक नागरिकांची हत्या करण्यात आली. यावेळी हत्या झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला गेला. त्यानंतर बांगलादेशने त्यांच्या नागरी सेवेतील नोकऱ्यांसाठी कोटा पद्धती लागू केली. 80 टक्के नोकऱ्या विशिष्ट सामाजिक गटांना (युद्धातील दिग्गज, बलात्कार पीडित, कमी प्रतिनिधित्व केलेले रहिवासी इ.) वाटल्या गेल्या. आणि फक्त 20 टक्के या मेरिटच्या आधारावर वाटल्या गेल्या होत्या, असे विवेक रामास्वामी यांनी सांगितले.

दरम्यान, यानंतर 2018 मध्ये झालेल्या निदर्शनांमुळे बांगलादेशने बहुतांश कोटा पद्धती रद्द केली होती. मात्र काही लोकांनी त्याला विरोध केला आणि यावर्षी कोटा प्रणाली पुन्हा लागू करण्यात आली. त्यामुळे हा हिंसाचार पुन्हा उफाळून आला. ज्यामुळे सरकार कोसळलं आणि पंतप्रधानपद सोडून नेत्याला देशातून पळून जावं लागलं. कट्टरतावादी आता हिंदू अल्पसंख्याकांना लक्ष्य करत आहेत. एकदा अराजकता सुरू झाली की ती सहजासहजी नियंत्रित करता येत नाही, असे विवेक रामास्वामी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

बांगलादेशात आरक्षणाविरोधात झालेल्या हिंसक परिस्थीतीमुळे शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. मिळालेल्या माहितीनुसार शेख हसीना गेल्यापासून 52 जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक समुदायांवर हल्ले झाल्याच्या किमान 205 घटना घडल्या आहेत. त्यामुळे अस्थिर वातावरणात आपल्या सुरक्षिततेच्या भीतीने हजारो बांगलादेशी हिंदूंनी हिंदुस्थानात आश्रय घेतला आहे.