नोकर कपातीत कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन पॅकेज, रतन टाटांची शिकवणी विसरली नाही ‘टीसीएस’

देशातील आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) सध्या मोठय़ा प्रमाणावर कर्मचारी कपात करत आहे. यामुळे कंपनीवर टीका होत आहे. कंपनीवर जबरदस्तीने राजीनामे घेण्याचे आरोपदेखील होत आहेत. या पार्श्वभूमीवर टीसीएसने एक महत्त्वपूर्ण आणि ठोस पाऊल उचलले आहे. रतन टाटांच्या शिकवणीनुसार, कंपनीने कामावरून काढून टाकण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी काही महत्त्वपूर्ण व ठोस पावले उचलली आहेत. या कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंतचे वेतन पॅकेज (सेवेरन्स पॅकेज) देण्याची तयारी कंपनीने दर्शवली आहे. यामुळे नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीचा आर्थिक आधार मिळणार असून त्यांना नव्या संधी शोधण्यासाठी आवश्यक वेळ आणि स्थैर्य मिळणार आहे.

बदलत्या ग्राहक मागण्या, वाढता ऑटोमेशनचा वापर आणि नव्या तंत्रज्ञानाशी सुसंगत राहण्यासाठी टीसीएसने नोकर कपात सुरू केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांची भूमिका आणि कौशल्ये सध्याच्या कंपनीच्या गरजांशी सुसंगत नाहीत, त्यांना या नोकर कपातीचा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषतः मध्यम व वरिष्ठ पदांवरील कर्मचाऱ्यांना या पुनर्रचनेचा सर्वाधिक परिणाम भोगावा लागू शकतो, असे संकेत मिळत आहेत. काही महिन्यांपूर्वी टीसीएसने 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून मुक्त करण्याची घोषणा केली होती. मात्र आता या कर्मचाऱ्यांना दोन वर्षांपर्यंतचे वेतन द्यायची तयारी दर्शवली आहे. रतन टाटांच्या निधनानंतरही टाटा समूहात त्यांच्या मूल्यांचा वारसा जिवंत असल्याचे या निर्णयातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

टाटांची ऑफर नेमकी काय?

प्रभावित कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम तीन महिन्यांचा नोटीस पगार (नोटीस पे) दिला जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या सेवेचा कालावधी आणि पदानुसार अतिरिक्त सेवा वेतन देण्यात येईल, ज्याचा कालावधी सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत असू शकतो. 15 वर्षांहून अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पॅकेज मिळण्याची शक्यता आहे. तसेच ‘बेंच’वर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळा प्रस्ताव आहे. हे असे कर्मचारी असतात जे सतत आठ महिन्यांहून अधिक काळ कोणत्याही प्रोजेक्टवर कार्यरत नसतात. सामान्यपणे अशा कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांच्या नोटीस पगारापुरतेच पॅकेज दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र 10 ते 15 वर्षांपर्यंत सेवा केलेल्या बेंच कर्मचाऱ्यांना सुमारे 1.5 वर्षांचे वेतन पॅकेज मिळू शकते.