टिसने 100 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; 60 शिक्षक, 40 शिक्षकेतर कर्मचाऱयांचा समावेश

टाटा एज्युकेशन ट्रस्टकडून निधी पुरवठा बंद झाल्यामुळे टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्स (टिस)च्या 100 कर्मचा-यांना नोकरीवरून तडकाफडकी काढण्यात आले. यामध्ये 60 शिक्षक आणि 40 शिक्षकेतर कर्मचा-यांचा समावेश आहे. नोकरीवरून कमी केलेल्या कर्मचा-यांच्या कराराचे नूतनीकरण केले जाणार नाही, असे टिसच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्समधून कमी करण्यात आलेले कर्मचारी हे 2008 पासून संस्थेत कार्यरत होते. त्यांनी विविध अभ्यासक्रम, संशोधन प्रकल्पसुद्धा राबवले आहेत. त्यांचे प्रकल्प सुरू असताना त्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे.

पगार मिळण्यात अडचणी
टीसच्या कर्मचा-यांना गेले अनेक महिने उशिराने पगार मिळत होता. त्यामुळे कर्माचारी टाटा ट्रस्टच्या अधिका-यांशी बोलून सतत पाठपुरावा करत होते. मात्र, पगार मिळण्यास अनेक अडचणी येत होत्या. गेल्या महिन्याचा पगारही ’टीस’च्या राखीव निधीतून देण्यात आला होता. टाटा एज्युकेशन ट्रस्ट काढून नियमित स्वरूपात निधीची पुरवठा बंद झाल्यामुळे कर्मचा-यांना कामावरून कमी करण्यात आले.