
टाटा समूहाने येत्या 5 वर्षात तब्बल 5 लाख तरुणांना रोजगार देण्याची मोठी घोषणा केली आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी याबाबतची माहिती दिली. आगामी काळात सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरीशी संबंधित उद्योग अशा अनेक क्षेत्रांमध्ये नोकऱ्या दिल्या जातील असे चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.
चंद्रशेखरन यांनी इंडियन क्वालिटी मॅनेजमेंट फाऊंडेशनच्या चर्चासत्रात याबाबतची घोषणा केली. या घोषणेदरम्यान त्यांनी उत्पादन क्षेत्रात नोकऱ्या निर्माण करण्यावर भर दिला आणि हिंदुस्थानच्या विकासित होण्याच्या ध्येयाच्या दृष्टीने हे क्षेत्र अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगितले. जर आपण उत्पादन क्षेत्रात नोकऱ्या वाढवू शकलो नाही, तर आपण विकसित हिंदुस्थानचे उद्दिष्ट साध्य करू शकणार नाही, असेही एन. चंद्रशेखरन म्हणाले.
गुंतवणुकीच्या आधारे नोकऱ्या
टाटा समूहाने विविध क्षेत्रातील वाढत्या गुंतवणुकीच्या आधारे या नोकऱ्या जाहीर केल्या आहेत. सेमीकंडक्टर उत्पादन, असेंबली, इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरीशी संबंधित आमच्या अनेक गुंतवणुकीच्या आधारे, पुढील पाच वर्षात रोजगार निर्मिती करू असा विश्वास टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी व्यक्त केला.
विविध उपक्रमांसाठी सरकारी मदतीची गरज
सेमीकंडक्टर प्रकल्प आणि इलेक्ट्रिक वाहने तसेच बॅटरीशी संबंधित अनेक युनिट्सची स्थापना टाटा समूह आसाममध्ये करत आहे. या क्षेत्रातील नोकऱ्यांचा अत्यंत सकारात्मक परिणाम होईल असे चंद्रशेखरन म्हणले. या उपक्रमासाठी सरकारी मदतीची गरज असल्याचेही ते म्हणाले. वाढत्या कर्मचाऱ्यांची पूर्तता करण्यासाठी हिंदुस्थानला अंदाजे 10 कोटी रोजगार निर्माण करावे लागेल याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.