शिक्षक संचमान्यता, कंत्राटी शिक्षक भरतीला विरोधच, 25 सप्टेंबरला राज्यभरातील शाळा बंदच

शिक्षक संचमान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या शासन निर्णयाविरोधात 25 सप्टेंबर रोजी राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयांवर विविध शिक्षक संघटना धडक मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे या दिवशी राज्यभरातील सर्व प्राथमिक शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. मिंधे सरकारचे शासन निर्णय वाडीवस्त्यांवरील विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असून दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी आंदोलन केले जाणार आहे.

मिंधे सरकारच्या अन्यायकारक निर्णयामुळे राज्यातील 15 हजार शाळांमधील शिक्षक कमी होणार आहेत. त्यामुळे सुमारे 2 लाख विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियम 2009 अन्वये शिक्षक निश्चितीचे निकष सन 2011पासून राज्यात लागू करून 13 वर्षे उलटली तरीही अद्याप अधिनियमातील तरतुदीनुसार प्राथमिक स्तर इयत्ता 1 ते 5 व उच्च प्राथमिक स्तर 6 ते 8 हा आकृतीबंध अद्याप लागू केलेला नाही. त्यामुळे बालकाच्या सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाच्या अधिनियमाचे उल्लंघन होत असल्याचा शिक्षक संघटनांचा आरोप आहे.

विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित

राज्य शासनाकडून 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाद्वारे शिक्षक निश्चितीचे जाहीर केलेले निकष हे वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहेत. वाडीवस्तीवर जन्म झाला म्हणून पटसंख्येअभावी शिक्षक कमी करून तेथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित ठेवणे हा त्या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे, अशी शिक्षक संघटनांची भूमिका आहे. वाडीवस्तीवर जन्म झालेल्या विद्यार्थ्यांचा दोष तरी काय, असा सवाल शिक्षकांनी केला.