महाडमधील शिक्षकांच्या बदल्यांना तूर्त स्थगिती, वाकी बुद्रुकमधील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षकांच्या बदल्यांना तूर्त स्थगिती देण्यात आल्याने वाकी बुद्रुकमधील श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी महारूद्र नाळे यांनी याबाबतचे पत्र श्री गुरुदत्त शाळेसह अन्य शाळांनाही पाठवले असून आता 11 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवी, नववीच्या परीक्षा सुरळीत पार पडणार आहेत.

महाडमधील वाकी बुद्रुकच्या गुरुदत्त माध्यमिक विद्यालयाला शिक्षकांअभावी टाळे लागले होते. पटसंख्या कमी असल्याचे कारण देत शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे आमच्या परीक्षा आता कोण घेणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता. तसेच पालकांनीही याबाबत चिंता व्यक्त केली होती. सरकारच्या शिक्षण विभागाच्या या तुघलकी निर्णयाबाबतचे वृत्त 8 एप्रिल रोजी दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची गंभीर दखल घेत रायगडच्या शिक्षण विभागाने ज्या शाळांमध्ये संच मान्यतेनुसार शून्य शिक्षक मंजूर आहेत, अशा शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या तात्पुरत्या रद्द केल्या आहेत.

नुकसान होऊ नये यासाठीच निर्णय
परीक्षा काळात मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षकांच्या बदल्यांना तूर्त स्थगिती दिली असून पुढील निर्णय पारीत होण्यापूर्वी ही स्थगिती कायम राहील, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे. या निर्णयामुळे परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थी व पालकांमध्ये असलेला संभ्रम दूर झाला आहे. शिक्षकांच्या बदल्या रद्द झाल्या नसल्या तर श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालय बंद होऊन विद्यार्थ्यांना 20 ते 30 किलोमीटर दूर असलेल्या बिरवाडी येथील शाळेत पायपीट करत जावे लागले असते.