‘टीम इंडिया’चा दस का दम

461

रोहित, राहुल, विराटची पायाभरणी; जाडेजा, ठाकूरचा विजयी कळस

कटक : विजयरथावर स्वार असलेल्या विराट कोहलीच्या सेनेने चुरशीच्या तिसऱया व निर्णायक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडीजवर 4 गडय़ांनी मात करीत 2-1 फरकाने मालिकाविजय साकारला. याचबरोबर हिंदुस्थानने विंडीजविरुद्ध सलग 10 द्विपक्षीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. विंडीजकडून मिळालेले 316 धावांचे लक्ष्य ‘टीम इंडिया’ने 48.4 षटकांत 6 फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केले. रोहित शर्मा, लोकेश राहुल व कर्णधार विराट कोहली यांनी अर्धशतके ठोकून भक्कम पायाभरणी केली, तर रवींद्र जाडेजा व शार्दुल ठाकूर यांनी मोक्याच्या वेळी 30 धावांची अभेद्य भागीदारी करीत विजयाचा कळस चढवला. विराट कोहली या सामन्याचा मानकरी ठरला, तर मालिकावीराची माळ रोहित शर्माच्या गळ्यात पडली.

रोहित-राहुल, विराटची अर्धशतक

विंडीजकडून मिळालेल्या 316 धावांच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा (63) व लोकेश राहुल (77) यांनी 21.2 षटकांत 122 धावांची सलामी देत हिंदुस्थानला झकास सुरुवात करून दिली. रोहितने 63 चेंडूंत, तर राहुलने 89 चेंडूंत 8-8 चौकार व 1-1 षटकार ठोकला. जेसन होल्डरने रोहितला यष्टीमागे होपकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. अल्झारी जोसेफने राहुलला यष्टीमागे झेलबाद केले. त्यानंतर श्रेयस अय्यर (7), रिषभ पंत (7) व केदार जाधव (9) झटपट बाद झाल्याने विंडीजच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, विराट कोहलीने 81 चेंडूंत 9 चौकारांसह 85 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र, किमो पौलने 47व्या षटकात विराटचा त्रिफळा उडवून पुन्हा सामन्यात रंगत निर्माण केली.

जाडेजा-ठाकूरचा हिसका

कोहली बाद झाल्यानंतर विंडीजच्या गोटात झालेला जल्लोष औट घटकेचा ठरला. कारण रवींद्र जाडेजा (नाबाद 39) व शार्दुल ठाकूर (नाबाद 17) यांनी मोक्याच्या वेळी 15 चेंडूंत नाबाद 30 धावांची भागीदारी करीत ‘टीम इंडिया’च्या विजयावर शिक्कामोर्तब केले. जाडेजाने 31 चेंडूत 4 चौकार लगावले, तर ठाकूरने 6 चेंडूंत अनपेक्षितपणे 2 चौकार व एक षटकार ठोकून विंडीजचे 17 वर्षांनंतर हिंदुस्थानमध्ये मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगवले. विंडीजकडून किमो पौलने सर्वाधिक 3 फलंदाज बाद केले, तर शेल्डॉत कॉटरेल, जेसन होल्डर व अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.

 

आपली प्रतिक्रिया द्या