ब्रिटनच्या फायटर जेटच्या दुरुस्तीसाठी 24 तज्ञांची टीम केरळमध्ये

ब्रिटनच्या अत्याधुनिक एफ-35 बी स्टेल्थ फायटर जेटने तब्बल 22 दिवसांपूर्वी गेल्या महिन्यात त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळावर तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग केले होते. तेव्हापासून हे विमान येथे फसले आहे. या लढाऊ विमानाच्या दुरुस्तीसाठी 24 तज्ञांची टीम आज केरळमध्ये दाखल झाली. या टीममध्ये 14 अभियंते आणि तांज्ञिक तज्ञ असून उर्वरित 10 जण विमान कर्मचाऱ्यांचे सदस्य आहेत. ही टीम विमानाचे संपूर्णपणे परीक्षण करणार असून तेथेच दुरुस्ती शक्य आहे का, की जेट पुन्हा ब्रिटनममध्ये न्यायला हवे याबाबत निर्णय होणार आहे.

विमान गेल्या 22 दिवसांपासून हिंदुस्थानात अडकून पडल्यामुळे ब्रिटनचे तंत्रज्ञ आणि सैन्य अधिकारी अतिशय चिंताग्रस्त असून त्यांना तंत्रज्ञान चोरीची भीती सतावतेय अशी माहिती आहे. तंत्रज्ञानांना घेऊन येणारे विमान एअरबस ए400एम अ‍ॅटलास विमान केरळमध्ये दाखल झाले. विमान परत जाणार असले तरीही तांत्रिक तज्ञ केरळमध्ये थांबून दुरुस्तीचे काम पाहणार आहेत. ब्रिटनच्या हाय कमिशनने दिलेल्या निवेदनात आपली भूमिका मांडली आहे. यूकेचे अभियंते त्रिवेंद्रम विमानतळावर दाखल झाले आहेत.

सी-17 ग्लोबमास्टरच घेऊन जाणार विमान

एफ-35 बी जेट अत्यंत आधुनिक असून त्याच्या अवजड आणि क्लिष्ट संरचना लक्षात घेता एअरबस ए400एम सारखे मध्यम आकाराचे विमान परत नेण्यासाठी अपुरे ठरते. त्यामुळे ब्रिटन मोठ्या क्षमतेचे सी-17 ग्लोबमास्टर विमान पाठवण्याची शक्यता आहे. जर हायड्रॉलिक यंत्रणा आणि इतर तांत्रिक बिघाड दुरुस्त करता आले तर हे विमान परत उड्डाण करू शकते.