हिंदुस्थानींना साहेबही ठोकणार सलाम, इंग्लिश क्रिकेटमध्ये लवकरच आयपीएल फ्रेंचायझीजचेही दिसणार संघ

क्रिकेटचा जन्मदाता इंग्लंड अर्थात साहेब हिंदुस्थानी क्रिकेटच्या ताकदीला आपला सलाम ठोकणार आहे. क्रिकेटमध्ये हिंदुस्थानी चाहत्यांचे आणि कंपन्यांच्या वाढत असलेल्या वर्चस्वामुळे त्यांना आकर्षित करण्यासाठी आपल्या स्थानिक स्पर्धांना हिंदुस्थानी दर्शकांच्या पसंतीनुसार बदलण्याची तयारी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) सुरू् केलीय. त्यामुळे येत्या मोसमात आयपीएलच्या संघमालकांचे संघ इंग्लिश क्रिकेटमध्ये दिसणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे.

आज क्रिकेटच्या जगावर हिंदुस्थानी क्रिकेटचे, हिंदुस्थानी चाहत्यांचे आणि हिंदुस्थानी कंपन्याचे वर्चस्व प्रस्थापित झालेय, हे कुणापासूही लपलेले नाही. त्यामुळे हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींसह हिंदुस्थांनी कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी ईसीबी आपल्या राष्ट्रीय लीगची फॉरमॅट बदलण्याची योजना आखत आहे. एवढेच नव्हे तर हिंदुस्थानी क्रिकेट विश्वाला आपल्याकडे खेचण्यासाठी आपल्या संघांचा 49 टक्का हिस्सा विकण्याचीही तयारी करत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या या योजना पुढच्या महिन्यापासून अमलात येऊ शकतात.

लंकाशायरही लागले तयारीला

इंग्लिश कौंटी संघ असलेल्या लंकाशायरने हिंदुस्थानी प्रेक्षकांना आपल्याकडे वळवण्यासाठी सर्वप्रथम पावले उचलली असून त्यांनी आपले सामने हिंदुस्थानात थेट प्रक्षेपित करायलाही सुरुवात केली आहे.  ‘जिओ टीव्ही’शी करार करून त्यांनी आतापर्यंत आपले 25 लाख नवे दर्शकही मिळवले आहेत. त्याचबरोबर श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर आणि व्यंकटेश अय्यरसारखे हिंदुस्थानी खेळाडूंशी करारही केला आहे. जेणेकरून त्यांना हिंदुस्थानी चाहत्यांशी आपले संबंध वाढवणे सोप्पे जाईल.

हंड्रेडला हिंदुस्थानी तडका

ईसीबीने आपले सर्वात आकर्षक असलेल्या ‘द हंड्रेड’ या लीगला हिंदुस्थानी चाहत्यानुसार बदलण्याची तयारी सुरू केली आहे. 100 चेंडूंचा हा खेळ टी-20 फॉरमॅटमध्ये बदलण्यास ईसीबीने मान्यता दर्शवली आहे. हिंदुस्थानात टी-20 क्रिकेटचा सर्वात मोठा प्रेक्षक वर्ग असल्यामुळे ईसीबीला आपल्या सर्वात लोकप्रिय लीगचा फॉरमॅट बदलण्यास भाग पडले आहे. त्याचबरोबर जागतिक क्रिकेटला आपल्याकडे वळवण्यासाठी ते आपला पारंपरिक मॉडेल मोडून नवे बदल स्वीकारण्यास तयार झाल्याचेही समोर आले आहे.