‘एआय’पुढे गुडघे टेकले! टेक कंपन्यांनी जुलैमध्ये 28 हजार कर्मचाऱ्यांना काढले

जुलै 2025 हा महिना टेक कंपन्यांतील कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरला. वेगवेगळ्या टेक कंपन्यांनी तब्बल 28 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. टेक इंडस्ट्रीमध्ये हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. यामध्ये इंटेल, मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेज (टीसीएस) या प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे. टीसीएसने जवळपास 12 हजार 261 कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. याचाच अर्थ ग्लोबल वर्कफोर्स 2 टक्के आहे.

इंटेल कंपनीने ओरेगनमधील 2 हजार 400 कर्मचाऱ्यांना, कॅलिफोर्नियातील 1935, तर एरिजोनामधील 700 कर्मचाऱ्यांना घरी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. जुलैमध्ये अमेरिकेतील 5 हजार कर्मचारी कपातीचा अंदाज आहे. गुगलने स्मार्ट टीव्ही डिव्हिजनमध्ये 25 टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्ट आपल्या ग्लोबल वर्कफोर्समधून जवळपास 9 हजार 100 कर्मचारी कपात करणार आहे. यामध्ये एक्सबॉक्स गेमिंग डिव्हिजन, सेल्स आणि लीगल टीममधील कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल. इंडिड आणि ग्लासडोरमधील 1 हजार 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाणार आहे.