
शहर आणि उपनगरांत मागील महिनाभर थंडीचा मुक्काम आहे. रविवारी थंडीची तीव्रता अधिक जाणवली आणि मुंबईकरांनी रात्री, पहाटेसह संपूर्ण दिवसभर सुखद गारवा अनुभवला. हवामान खात्याच्या कुलाबा व सांताक्रूझ येथील केंद्रांवर तापमानात मोठी घसरण नोंद झाली. कमाल तापमानात अचानक 4 अंशांची मोठी घट झाली, तर किमान तापमान 18 अंशांपर्यंत घसरले. याचदरम्यान वाऱ्याचा वेग आणि हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले.
मुंबई शहर आणि उपनगरांत डिसेंबरच्या अखेरीपासून थंडी मुक्कामी आहे. गेले महिनाभर शहराचे किमान तापमान 20 अंशांच्या आसपास राहिले आहे, मात्र अधूनमधून दिवसा उन्हाचे चटके बसत आहेत. रविवारी दिवसा गारव्याने उन्हाच्या तीव्रतेवर मात केली. सकाळपासून सायंकाळपर्यंत थंड वारे प्रवाहित राहिले होते. त्यामुळे रविवारची सुट्टी मुंबईकरांनी ‘एन्जॉय’ केली. तरुण-तरुणींनी आपल्या मित्रमंडळींसोबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची सफर केली. थंडीच्या तीव्रतेमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘मॉर्निंग वॉक’साठी येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. केवळ कांदिवली, बोरिवली परिसरातूनच नव्हे तर अंधेरी, वांद्रे, दादर परिसरातूनही अनेक पर्यावरणप्रेमी सुट्टीच्या दिवशी राष्ट्रीय उद्यानात हजेरी लावत आहेत. थंडीमुळे हे चित्र दिसत असल्याने वन अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईबरोबर आसपासच्या परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार, रविवारी पालघरमध्ये 15.3 अंश, ठाण्यात 20 अंश, डहाणू-16.6 अंश आणि नवी मुंबईत 18 अंश इतके किमान तापमान होते. कमाल तापमानातदेखील घट झाल्याने संपूर्ण मुंबई महानगरातील नागरिकांना थंडीमुळे हुडहुडी भरली आहे.
राज्यात कडाका
ग्रामीण भागात थंडीचा कडाका वाढला आहे. अनेक जिह्यांत किमान तापमानाचा पारा 11 ते 12 अंशांपर्यंत खाली आला आहे. रविवारी गोंदियामध्ये सर्वात नीचांकी 9.8 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली. तसेच मालेगावमध्ये 11, नगर- 12.4, जळगाव-12.6, महाबळेश्वर-13.8, अमरावती-13.3, छत्रपती संभाजीनगर-14.6 आणि बीडमध्ये 14.5 अंश तापमान होते. थंडीचा कडाका जानेवारीच्या अखेरीपर्यंत कायम राहील, बहुतांश जिह्यांमध्ये आणि शहरांमध्ये किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली जाईल, तसेच कमाल तापमानही सरासरीपेक्षा कमी राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
























































