
ठाण्यात हळूहळू गुलाबी थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळच्या सुमारास शहराचा पारा २०.९ अंश सेल्सिअसवर घसरल्याने ठाणेकरांना हुडहुडी भरली. महामार्गावर तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात धुक्याची दाट चादर पसरली होती. तसेच दिवसभर हवेत गारवाही होता. पुढील दोन-तीन दिवसांत थंडीचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता असल्याने ठाणेकरांनी स्वेटर, मफलर कपाटातून बाहेर काढले आहेत.
परतीच्या पावसाने दिलेला तडाखा त्यापाठोपाठ ऑक्टोबर हिट यामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र आता थंडीची चाहूल लागली असून आज पारा २० अंशांवर खाली आला. ठाणे शहराची ओळख तलावांचे शहर म्हणून आहे. तलाव आणि शहरालगत असलेल्या राष्ट्रीय उद्यानामुळे हवेत गारवा अधिक जाणवू लागला आहे. याचबरोबर शहरालगत असलेल्या घोडबंदर आणि नवे ठाणे या भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामुळे या परिसरात गृहसंकुल, टॉवर यांची संख्या वाढली असून या परिसरातदेखील थंडी वाढली आहे. त्यामुळे बाजारात स्वेटर आणि जर्किंग खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठांमधील स्टॉल्सवर वेगवेगळ्या पद्धतीचे रंगीबेरंगी नव्या डिझाईनचे स्वेटर, जॅकेट, स्कार्फ पाहायला मिळत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील कमाल आणि किमान तापमानात घट होत असून विशेष करून सकाळी आणि रात्रीच्या वेळी शहरातील वातावरणात थंडी जाणवत आहे. ठाण्याचे किमान तापमान २१ अंश तर कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.



























































