
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन, संवर्धन व जिर्णोद्वाराची कामे शासन निधीतून पुरातत्व विभागामार्फत दि.16/12/2023 पासून सुरू करण्यात आली आहेत. सदर कामाचे पर्यवेक्षण करून गुणवत्तापूर्ण कामे पुरातत्व विभागामार्फत करून घेण्यात येत आहेत. तथापि, दिनांक 22 व 26 जुलै रोजी मंदिरात मुसळधार पावसाने गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुरातत्व विभागाला दि.22 व 26 जुलै रोजी पत्रव्यवहार करून कळविण्यात आले आहे.
सदर जतन व संवर्धन कामासंदर्भात मंदिर समितीच्या वेळोवेळी झालेल्या सभेमध्ये आढावा घेण्यात येत आहे आणि तशा सुचना पुरातत्व विभाग व कंत्राटदार यांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, यंदा पावसाळा लवकर सुरू झाल्याने वॉटरप्रुफींगची कामे वेळेत पूर्ण करता आली नाहीत, असे पुरातत्त्व विभागाने कळवले आहे. परंतु, गळती होऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात आलेल्या आहेत. आराखड्यातील सर्व कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावीत व आतापर्यंत झालेल्या कामाचे त्रयस्थ शासकीय संस्थेकडून ऑडीट करणेबाबत जिल्हाधिकारी सोलापूर यांना प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.