उधमपुरात गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला; सीआरपीएफ अधिकारी शहीद

देशभरात रक्षाबंधनाचा सण साजार होत असतानाच जम्मू-कश्मीरात उधमपूर जिल्हय़ात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात इन्स्पेक्टर कुलदीप कुमार हे शहीद झाले. दरम्यान, जम्मू-कश्मीरातील दहशतवादी हल्ले कधी रोखणार, असा सवाल जनता पंतप्रधान मोदींच्या एनडीए सरकारला विचारत आहेत.

उधमपूर जिल्हय़ातील डुडु भागातील चिल गावात सीआरपीएफ आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या पथकाची गस्त सुरू होती. हा परिसर अतिशय दुर्गम आहे. दुपारी 3.30च्या सुमारास लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांच्या गस्ती पथकावर गोळीबार करीत हल्ला केला. त्यात इन्स्पेक्टर कुलदीप कुमार हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

हल्ल्यानंतर दहशतवादी जंगलात पळून गेले. सीआरपीएफ जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत सर्च ऑपरेशन सुरू केले. रात्री उशिरापर्यंत येथे चकमक सुरू होती.

पाच दिवसांपूर्वी कॅप्टन शहीद झाले होते

जम्मू-कश्मीरात सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. पाच दिवसांपूर्वी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दोडा जिल्हय़ात चकमकीत लष्कराचे कॅप्टन दीपक सिंह हे शहीद झाले होते.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हल्ले वाढले

जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणूक काही दिवसांपूर्वी जाहीर झाली आहे. तीन टप्प्यांत ही निवडणूक होत आहे. 370 कलम हटविल्यानंतर होणारी ही निवडणूक महत्त्वपूर्ण आहे. दरम्यान निवडणूक जाहीर झाल्यानंतर दहशतवादी हल्ल्यांमध्ये आणखी वाढ झाली आहे.

या वर्षी 21 जवान शहीद

जानेवारीपासून आतापर्यंत जम्मू-कश्मीरात दहशतवादी हल्ल्यांमध्ये 74 जणांचा मृत्यू झाला. त्यात 21 जवान शहीद झाले आहेत. जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देताना 35 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

सर्वाधिक दहशतवादी हल्ले जम्मू विभागातील दोडा, कठुआ, रिआसी, पुंछ आणि राजौरी या जिल्हय़ांत झाले आहेत. या जिल्हय़ात 14 जवान शहीद झाले.