‘टॅक्स’लाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा, अमेरिकेत 32 लाखाला तर हिंदुस्थानात 61 लाखाला कार

मागील आठवड्यात एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने आपल्या ईव्हीचे वाय मॉडल मुंबईत लाँच केले. लाँचिंग केल्यापासून या कारच्या किमतीवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अमेरिकेत टेस्लाच्या वाय मॉडेलची किंमत 32 लाख रुपये आहे, तर याच मॉडेलची हिंदुस्थानात किंमत तब्बल 61 लाख रुपये आहे. याचाच अर्थ या कारवर हिंदुस्थानात तब्बल 29 लाख रुपयांचा टॅक्स लावला जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक जण या कारला टेस्लाऐवजी टॅक्सला कार असे म्हणत आहेत.

या कारची बुकिंग सुरू झाली असून दिवाळीच्या आधी डिलिव्हरी ग्राहकांना मिळणार आहे. टेस्ला इंडियाच्या वेबसाईटनुसार, हिंदुस्थानात सध्या केवळ वाय मॉडल उपलब्ध आहे. जे दोन व्हेरियंटमध्ये येते. स्टॅण्डर्ड रियर व्हील ड्राइव्हची किंमत 61.07 लाख रुपये तर लाँग रेंज रियर व्हील ड्राइव्हची किंमत 69.15 लाख (एक्स शोरूम) आहे, तर अमेरिकेत मॉडल वायची किंमत 7500 डॉलरच्या टॅक्सनंतर 37,490 म्हणजेच 32 लाख रुपये आहे. चीनमध्ये 31 लाखाला, जर्मनीत 46 लाखाला ही कार उपलब्ध आहे. हिंदुस्थानात टेस्ला कारला आयात केले जाते. त्यामुळे या कारवर आयात शुल्क लावले जात आहे. फुल चार्जवर आरडब्ल्यूडीची रेंज 500 किलोमीटर आहे, तर एडब्ल्यूडी मॉडलची रेंज 622 किलोमीटर आहे.