ठाणे-बोरिवली बोगदा खोदण्यासाठी ‘नायक’ भिडला, एक तासाचे अंतर 15 मिनिटांत कापता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील मेट्रोचे बोगदे करण्यासाठी ‘मावळा’ने पराक्रम गाजवला असतानाच आज ठाणे-बोरिवली दरम्यानचा बोगदा खोदण्यासाठी ‘नायक’ भिडला. अत्याधुनिक असे हे सिंगल शिल्ड हार्ड रॉक टनल बोरिंग मशीन असून बोगदा खोदण्याचा शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या यंत्राला ‘नायक’ असे नाव देण्यात आले असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगरातून हा ‘नायक’ आरपार जाणार आहे. टनल प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाण्याहून बोरिवलीला 15 मिनिटांत जाणे शक्य होणार असून त्यामुळे शहरातील वाहतूककोंडीही फुटणार आहे.

ठाण्याहून बोरिवलीला घोडबंदर मार्गे जाण्यासाठी एक ते दीड तास लागतो. त्यात वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र आता आकाराला येणाऱ्या या ठाणे-बोरिवली बोगद्यामुळे लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा टनल प्रकल्प 11.84 किमी लांबीचा आहे. त्यापैकी 10.25 किमीचा मार्ग प्रत्यक्ष संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहे. मे 2028पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल, असा विश्वास आज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

ठाणे ते बोरिवली दरम्यान होणारा प्रत्येकी तीन पदरी दुहेरी बोगदा हा हिंदुस्थानातील सर्वात मोठय़ा बोगद्यांपैकी एक ठरणार आहे. त्यामुळे ठाणे ते बोरिवली अंतर 23 किलोमीटरवरून 12 किलोमीटरपर्यंत कमी होणार आहे.

एमएमआरडीएच्या माध्यमातून टनेलचा प्रकल्प करण्यात येत असून त्यासाठी 16 हजार 600 कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे.  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून बोगदा खोदण्याचे मोठे आव्हान आजपासून ‘नायक’ने स्वीकारले आहे.

घोडबंदरच्या चितळसर-मानपाडाजवळील मुल्ला बाग परिसरातून हा बोगदा करण्यास आजपासून सुरुवात झाली. ‘नायक’मध्ये कमी व्हायब्रेशन तंत्रज्ञानाचा वापर केला असून धुळीचा त्रास होऊ नये म्हणून डेडिकेटेड डेब्रिज कॉरीडोर तयार करण्यात येणार आहे.

मदतीसाठी ‘अर्जुना’ येणार

आजपासून बोगदा खोदण्यासाठी ‘नायक’ भिडला असला तरी लवकरच त्याच्या मदतीसाठी ‘अर्जुना’ येणार आहे. टनल प्रकल्पासाठी दोन टीबीएम मशीनचा वापर करण्यात येणार असून त्यातील एकाला ‘नायक’ तर दुसऱयाला ‘अर्जुना’ हे नाव दिले आहेत. संजय गांधी उद्यानातील फुलपाखराचे नाव ‘नायक’ आहे तर त्याच भागातील झाडाचे नाव ‘अर्जुना’ असल्याने ते दुसऱया ‘टीबीएम’ला दिले आहे.

ही आहेत वैशिष्टय़े

बोगद्यामध्ये स्मोक डिटेक्टर, एलईडी लायटिंग आणि दिशादर्शक यंत्रणा   सात मीटर रुंदीचे सेवा रस्ते

टीबीएमची (अत्याधुनिक टनल बोरिंग मशीन) लांबी 90 मीटर, तर वजन 2 हजार 500 टन   बोगद्यात सहा पदरी मार्ग   जैवविविधतेची कोणतीही हानी नाही   11 हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प.