
शाळेत पायी जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीला रस्त्यातच नराधम चालकाने अडवले आणि गाडीत बसण्याचा आग्रह केला. सुरुवातीला तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. घाबरलेल्या स्थितीत ती रस्त्याने पुढे पुढे जाऊ लागली. मात्र हा नराधम तिचा पाठलाग करू लागला. त्यामुळे या मुलीने मोठे धाडस करून रस्त्यातच दगड उचलून त्याच्यावर उगारला असता कारचालक पळून गेला. हा प्रकार ऐरोली परिसरात घडला आहे. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ऐरोली येथे राहणारी एक विद्यार्थिनी झेंडा वंदन समारोहसाठी शाळेत पायी जात होती. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. ही संधी साधून एका व्यक्तीने तिचा पाठलाग करीत तिच्या अगदी जवळ स्वतःची कार थांबवली आणि कारचा दरवाजा उघडून गाडीत बसण्यास सांगितले. मात्र त्या विद्यार्थिनीने नकार दिला तरी त्याने आग्रह केला. त्यामुळे रागाच्या भरात त्या अनोळखी व्यक्तीने अश्लील भाषेत शिवीगाळ केली. मात्र विद्यार्थिनीने न घाबरता रस्त्यावर पडलेला दगड उचलून त्याच्यावर उगारला. तिचे उग्र रूप पाहून कारचालकाने गाडी जोरात दामटवली आणि तो निघून गेला. घडलेल्या प्रसंगाबाबत त्या विद्यार्थिनीने पालकांना माहिती देताच त्यांनी तत्काळ रबाळे पोलीस ठाण्यात जाऊन कारचालकाच्या विरोधात तक्रार केली. त्याची दखल घेत पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा नोंद केला असून नराधमाचा कसून शोध घेत आहेत.