
ठाणे जिल्ह्यातील पहिले तारांगण शहापूरमध्ये उभे राहिले असून या तारांगणचे उद्घाटन खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांच्या हस्ते उद्या होणार आहे. या ठिकाणी तारांगणसह चार अत्याधुनिक मोठे दुर्बिण असलेली वेधशाळा बांधण्यात आली आहे. त्यामुळे खगोलप्रेमींसाठी हा प्रकल्प एक पर्वणी ठरणार आहे. उद्या सायंकाळी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला स्थानिक आमदार दौलत दरोडा हेही उपस्थित राहणार आहेत.
नीलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांना खगोलशास्त्राची आवड आहे. जनमानसात खगोल विज्ञानाची रुची निर्माण व्हावी यासाठी त्यांनी ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे साडेतीन एकर जागा घेऊन तेथे हा सॅपो प्रकल्प उभारला आहे. ठाणे जिल्ह्यातील हे पहिलेच तारांगण असून सोबत अत्याधुनिक चार मोठे दुर्बिण असलेली वेधशाळाही त्यामध्ये आहे. खगोलप्रेमींसाठी शहापूर येथील साकडबाव येथे पोकलेवाडीनजीक जुनोनी-कोथरा रोडवर हा सॅपो प्रकल्प उभारण्यात आला आहे.
ग्रहांचे दर्शन होणार
दुर्बिणीतून गुरू ग्रहाचे चंद्र, गुरू ग्रहावरील पट्टा, डाग स्पष्टपणे दिसतात. शनी ग्रहाची वलये, देवयानी दीर्घिकांचे दर्शन घेता येते. रात्रभर आकाश निरीक्षण करता येणार आहे. रात्री झोपण्यासाठी स्वतंत्र खोल्याही बांधण्यात आल्या आहेत. या सॅपो प्रकल्पात प्रदर्शन हॉल आणि सेल्फी पॉइंट्सदेखील आहेत. आकाश दर्शन घडविण्यासाठी स्वयंसेवकही आहेत. तसेच खाद्यपदार्थ, भोजन यासाठी कॅन्टीनची सोयदेखील करण्यात आली आहे.
या प्रकल्पाला भेट देणाऱ्या खगोलप्रेमींना ७५०६२६६२६६ किंवा ७५०६३२२३२२ या दूरध्वनीवर संपर्क साधून आपल्या नावाची नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर त्यांना सॅपो प्रकल्पास भेट देता येणार आहे.
अत्याधुनिक तारांगणमध्ये ५६ सीट्स असून तेथे अर्धा ते एक तासांचा मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत खगोलशास्त्रीय माहितीचा शो दाखविण्याची सोय आहे.
वेधशाळेत चार मोठे दुर्बिण काँक्रीट पीलर्सवर बसविण्यात आले असून आकाश निरीक्षण करताना एक बटण दाबून स्वयंचलित छप्पर मागे नेण्याची सोय करण्यात आली आहे. १६, १४, १० आणि ६ इंच व्यास असलेल्या आरशाच्या दुर्बिणीतून आकाशातील वेगवेगळ्या गोष्टी निरीक्षण करण्याची सोय आहे.



























































