
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाली आहे. या गॅसटंचाईचे पडसाद आता थेट ठाणे पालिकेच्या परिवहन सेवेलाही बसला आहे. गॅसच मिळत नसल्याने वागळे इस्टेट आगाराच्या परिवहन कॅन्टीनमध्ये स्वयंपाक करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे आजपासून टीएमटीचे कॅन्टीन बंद करण्यात आले असल्याने टीएमटी कर्मचाऱ्यांचे खाण्यापिण्याचे वांदे झाले असून कर्मचाऱ्यांना घरून डबा आणण्याचे तोंडी आदेश देण्यात आले आहेत.
अमेरिका-इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा भासत आहे. या युद्धाचा फटका आता ठाणे महापालिकेच्या बागळे इस्टेट येथील परिवहन उपाहारगृहापर्यंत पोहोचला आहे. गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्या कारणाने आजपासून कॅन्टीन बंद ठेवण्याचा निर्णय उपाहारगृहचालकाने घेतला आहे. परिवहन इमारतीच्या तळमजल्यावर प्रशस्त असे कॅन्टीन आहे. दिवसभरात किमान ८०० ते १००० चालक, वाहक तसेच इतर कर्मचारी जेवण व अल्पोपाहार करतात. मात्र कॅन्टीनमध्ये असलेले गॅस सिलिंडर संपले असल्याने कॅन्टीनला टाळे लावण्याची वेळ आली आहे.
इलेक्ट्रिक शेगड्या बसवा
कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून तातडीने पर्यायी व्यवस्था शोधण्याचे काम सुरू झाले आहे. कॅन्टीनमध्ये स्वयंपाक सुरू ठेवण्यासाठी गॅसऐवजी इलेक्ट्रिक शेगड्या बसविण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, आखाती देशातील परिस्थिती लक्षात घेऊन आधीच टीएमटी प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे होते. मात्र भोंगळ कारभारामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा संताप व्यक्त होत आहे.





























































