बोगस मतदान, नावे गायब, ईव्हीएम लोच्या; कोणतेही बटण दाबा मत कमळालाच, मतदान केंद्रात पोलिंग एजंटच्या खिशाला भाजपचे बिल्ले

ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, वसई-विरार, भिवंडी, पनवेल, नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील ३ हजार ६२६ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रांमध्ये बंदिस्त झाले. मात्र आज झालेल्या मतदानात निवडणूक यंत्रणेकडून मतदारांची क्रूर थट्टाच करण्यात आली. नवी मुंबईत कोणतेही बटण दाबले तरी मत मात्र फक्त कमळालाच जात होते. मीरा-भाईंदरमध्ये तर मतदान केंद्रात पोलिंग एजंट खिशाला भाजपचे बिल्ले लटकवून बसले होते. गंभीर बाब म्हणजे मतदान अधिकाऱ्यांच्या समोर खुलेआम हा तमाशा सुरू होता. ठाण्यापासून कल्याण, डोंबिवली, पनवेल, नवी मुंबईत बोगस मतदारांनी धुमाकूळ घातला. अनेक ठिकाणी मतदार याद्यांमधून नावेच गायब झाली होती. ईव्हीएमने तर मतदान सुरू होताच मान टाकली. त्यामुळे मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याने तर मोठा संशयकल्लोळ उडाला. या घटनेमुळे मतदान प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट लागल्याच्या संतप्त प्रतिक्रिया मतदारांनी व्यक्त केल्या.

ठाण्यात मतदान प्रक्रियेत सकाळपासूनच गोंधळ उडाला होता. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडले. एकाच वेळी सगळीकडे ईव्हीएम बंद पडू लागल्याने काहीतरी लोच्या असल्याचा संशय मतदारांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक १३ मध्ये रामचंद्रनगर येथील बुथवर शिंदे गटाचे कार्यकर्ते ईव्हीएम मशीनचा डेमो दाखवत त्यांच्या उमेदवारांना मतदान करण्यास सांगत होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. तर वागळे इस्टेटमध्ये संत ज्ञानेश्वरनगर प्रभागात शिंदे गटाच्या कार्यालयात सकाळीच पैसे वाटप सुरू झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते पसार झाले. भाजप आणि शिंदे गटासाठी अवघी निवडणूक यंत्रणा दावणीला बांधली गेल्याचा आरोप विरोधकांनी केला.

बोगस मतदारांचा धुमाकूळ

  • कल्याण पूर्व येथील गायत्री शाळेतील मतदान केंद्रात मतदान करायला आलेल्या सुमन गायकवाड या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेले होते.
  • कल्याण पूर्वेतील सेंट लुडस शाळेत रमेश पवार हे मतदान करण्यासाठी गेले असता त्यांच्या नावावर आधीच मतदान झाले होते. पनवेलमध्ये निवडणूक आयोगाने बोगस मतदानाला वाव दिला. मतदारांच्या बोटाला शाई लावण्यात आली नाही. यावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेतला.
  • नवी मुंबईत प्रभाग क्रमांक २३ मध्ये मतदान केंद्रावर आलेल्या बोगस मतदारांना उमेदवार आणि त्यांच्या कार्यकत्यांनी पकडून बेदम मारहाण केली.
  • कोपरखैरणे येथील राहत असलेल्या महिलेचे नाव तुर्भे एमआयडीसीतील मतदान केंद्रावर आले होते, ती मतदान करण्यासाठी आली असता तिच्या नावावर आधीच कोणीतरी मतदान केले होते.
  • ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक १३ आणि १४ मध्ये सकाळी दोघेजण मतदानासाठी आले असता त्यांना धक्का बसला. त्यांच्या नावावर आधीच कोणीतरी मतदान केले होते.

मीरा रोडमध्ये मतदान केंद्रात भाजपचा प्रचार

भाईंदर मौरा-भाईंदर महापालिका निवडणुकीचे मतदान सुरू असताना मतदान केंद्रातच भाजपच्या उमेदवार प्रतिनिधींनी प्रचार केल्याचा धक्कादायक प्रकार आज घडला. प्रभाग क्रमांक २० मधील शांतीनगर हायस्कूलमधील मतदान केंद्रात भाजपच्या उमेदवार प्रतिनिधींनी आपल्या खिशाला उमेदवारांच्या नावांच्या पाट्या लावल्या होत्या. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अन्य उमेदवारांनी जोरदार आक्षेप घेतला. मतदान केंद्रात होत असलेल्या या प्रचाराचे फेसबुक लाईव्ह करण्यात आले. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी या पोलिंग एजंटनी आपल्या खिशाला लावलेल्या पाट्या काढून घेतल्या. मतदान केंद्रात असलेल्या उमेदवार प्रतिनिधींना निवडणूक आयोगाकडून एक स्टिकर दिले जाते. त्यावर फक्त उमेदवार प्रतिनिधी असा उल्लेख असतो. मात्र मीरा रोड येथील सेक्टर २ मधील शांतीनगर हायस्कूलमध्ये असलेल्या मतदान केंद्रात भाजपच्या उमेदवार प्रतिनिधींनी उमेदवारांच्या नावाच्या पाट्या लावल्या होत्या. त्यावर उमेदवार नाव आणि त्यांच्या गटाचा उल्लेख करण्यात आला होता. हा प्रकार मतदारांच्या निदर्शनास आल्यानंतर एकच खळबळ उडाली. अन्य पक्षाच्या उमेदवारांनी बुथमध्ये होत असलेल्या या प्रचारावर जोरदार आक्षेप घेतला. संतप्त उमेदवारांनी भाजपचा हा खोडसाळपणा चव्हाट्यावर आणण्यासाठी फेसबुक लाईव्ह केले. त्यामुळे निवडणूक यंत्रणेची एकच पळापळ उडाली. त्यानंतर भाजप उमेदवार प्रतिनिधींच्या खिशाला असलेल्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या काढण्यात आल्या. या पाट्यांवर हेतल परमार, दीप्ती भट, संजय पवार आणि दिनेश जैन यांच्या नावांचा समावेश होता.

ठाणे – ५७
कल्याण-डोंबिवली – ४९
नवी मुंबई – ५३
भिवंडी – ५५
मीरा-भाईंदर  -४४.६६
वसई-विरार  -५५
पनवेल – ५३
उल्हासनगर – ५०