
किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून बॉयफ्रेंडने नाते तोडले आणि मोबाईल नंबर ब्लॉक केला. त्यामुळे निराश झालेल्या एका २० वर्षीय तरुणीने धावत्या लोकलमधून वाशी खाडीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पाण्यात पडल्यानंतर ही मुलगी बचावासाठी धडपड करीत असताना देवदूत म्हणून ओळखले जाणारे मच्छीमार महेश सुतार यांनी घटनास्थळी आपल्या बोटीसह धाव घेतली आणि तिचे प्राण वाचवले. हा प्रकार आज सकाळी साडेसातच्या सुमारास घडला.
चेंबूर येथे राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीचे आपल्या बॉयफ्रेंडबरोबर भांडण झाल्यानंतर बॉयफ्रेंडने तिच्याशी बोलणे बंद केले. बॉयफ्रेंड फक्त एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तिला सोशल मीडिया आणि मोबाईलवरही ब्लॉक केले. त्यामुळे ही तरुणी निराश झाली. आज सकाळी सवासातच्या सुमारास ती चेंबूर येथून नवी मुंबईच्या दिशेने येत असलेल्या लोकलमध्ये बसली. लोकल वाशी खाडीपुलावर आल्यानंतर तिने स्वतःला खाडीत झोकून दिले. त्यावेळी मच्छीमार रोशन भोईर आणि महेश सुतार हे खाडीत मासेमारी करीत होते. त्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर ते आपली बोट घेऊन ज्या ठिकाणी या तरुणीने उडी मारली, त्या दिशेने गेले आणि या तरुणीला त्यांनी पाण्यातून बाहेर काढले.
या प्रकाराची माहिती वाशी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती स्थिर असून तिला लवकरच तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे, असे वाशीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी सांगितले.
बॅगमुळे प्राण वाचले
वाशी खाडीपुलावर आल्यानंतर लोकलचा वेग थोडा कमी होतो. आज सकाळीही लोकलचा वेग मंदावल्यानंतर या तरुणीने खाडीत उडी मारली. त्यावेळी तिच्या पाठीला बॅग होती. या बॅगमध्ये हवा असल्याने ती पाण्यावर तरंगत राहिली. ती बचावासाठी धडपडत असताना महेश सुतार बोट घेऊन तिथे आले आणि त्यांनी तिला पाण्यातून बाहेर काढले. आत्महत्या करण्यामागचे तिने कारण सांगितल्यानंतर सर्वांनी डोक्यावर हात मारून घेतला.






























































