ठाण्याच्या लोकमान्य, सावरकरनगरात बेवारस वाहनांची उचलबांगडी; अतिक्रमणे हटवून फुटपाथ मोकळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रस्त्याच्या कडेला वर्षानुवर्ष बेकायदा उभ्या असलेल्या बेवारस वाहनांची ठाणे पोलिसांच्या अतिक्रमण विभागाने उचलबांगडी केली आहे. ठाणे पालिकेचे अतिक्रमण पथक, वाहतूक विभाग यांनी विशेष मोहीम राबवत जवळपास १९ बेवारस वाहने जप्त केली आहेत. ही अतिक्रमणे हटवून नागरिकांसाठी फुटपाथ मोकळे करण्यात आले.

लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समितीमध्ये होत असलेली वाहतूककोंडी सोडविण्यासाबाबत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या दालनात नुकतेच एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्रभागात रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या बेवारस वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या होत्या. ही कारवाई आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानंतर अतिक्रमण विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनसोडे, पोलीस विभाग, वाहतूक विभाग व ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली.

महात्मा फुलेनगर, कोरस रोड, वेदांत कॉम्प्लेक्स, यशोधननगर, लोकमान्य बस डेपो पसिरातील अतिक्रमण व बेवारस वाहनांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत चार चारचाकी, तीन तीनचाकी व १२ दुचाकी अशी एकूण १९ वाहने जप्त करण्यात आली.

मार्च महिन्यात प्रभाग समितीअंतर्गत एकूण ३२ बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. या मोहिमेमुळे वाहतूक सुलभहोण्यास तसेच सार्वजनिक ठिकाणी शिस्त राखण्यास मदत होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.