बुलेट ट्रेनच्या म्हातार्डी स्टेशन परिसरात बिझनेस हब; गावकऱ्यांच्या जमिनीवर डोळा, आराखडा रद्द करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले

धनदांडग्यांच्या सोयीसाठी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प सध्या फास्ट ट्रॅकवर आहे. या मार्गातील बारा स्थानकांपैकी एक स्थानक म्हाताडर्डी येथे होत असून त्या परिसरात भव्य बिझनेस हब उभारले जाणार आहे. केंद्र व राज्य सरकार या धनदांडग्यांसाठी तत्पर झाले असून बिझनेस हबसाठी म्हातार्डी परिसरातील शेकडो एकर जमिनीवर डोळा ठेवण्यात आला आहे. ही जमीन ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच ठाणे महानगरपालिकेने हरकती व सूचनाही मागवल्या आहेत. या बिझनेस हबमध्ये कसत्या जमिनी जाणार असल्याने शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे.

ताशी ३२० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या मार्गातील म्हातार्डी स्टेशनचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. बुलेट ट्रेनचा हा प्रकल्प जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी (जेआयसीए) करीत आहे. याच कंपनीच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य सरकार म्हाताडीं स्टेशनजवळ अत्याधुनिक बिझनेस हब उभारत असून त्यासाठी नोडल एजन्सी म्हणून ठाणे महानगरपालिकेची नियुक्ती करण्यात आली आहे. या हबकरिता आगासन, दातिवली, म्हातार्डी, बेतवडे, उसरघर, भोपर, नांदिवली या गावांमधील शेकडो एकर जमीन संपादित केली जाणार आहे.

गावकऱ्यांच्या जमिनी, घरे, शेती आणि भविष्य धोक्यात घालणारी पालिकेची ही गुप्त आणि बेकायदेशीर पद्धत आम्ही थांबवणारच. कायद्याच्या प्रत्येक तरतुदीनुसार ग्रामस्थांसाठी लढा देऊ. चारही गावांच्या हितासाठी मी स्वतः आघाडीवर राहून स्थानिकांना न्याय मिळवून देणारच.

अॅड. रोहिदास मुंडे (शिवसेना ग्रामीण विधानसभाप्रमुख)

प्रस्ताव रद्द करा

म्हातार्डी बुलेट ट्रेन स्टेशनच्या परिसरात उभारण्यात येणारा बिझनेस हबचा प्रस्ताव त्वरित रद्द करा, अशी मागणी आगासन, दातिवली, बेतवडे, भोपर, उसरघर, नांदिवलीमधील शेकडो ग्रामस्थांनी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत या हबसाठी आमच्या जमिनी देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

या आहेत हरकती

  • लोकल एरिया प्लॅन तयार करताना कोणत्याही प्रकारची ग्रामसभा किंवा सुनावणी घेतली नाही
  • बिझनेस हबचा आराखडा हा महापालिकेच्या विकास आराखड्याशी विसंगत आहे
  • नैसर्गिक जलमार्ग, शेती, नाले व हरित क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात आलेला नाही
  • हजारो ग्रामस्थ विस्थापित होण्याचा धोका
  • एमआरटीपी कायद्याचे उल्लंघन करण्यात आले आहे.

प्रशासनाचा चोरीछुपके कारभार

जमीन ताब्यात घेण्याकरिता ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी १७ ऑक्टोबर रोजी सूचना प्रसिद्ध केली. पण त्याची स्थानिकांना कोणतीही माहिती नव्हती तसेच त्यासंदर्भात ग्रामस्थांना विश्वासातही घेतले नाही, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभाप्रमुख अॅड. रोहिदास मुंडे यांनी केला आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत महापालिकेने सूचना व हरकती मागवल्या आहेत. मुंडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाच्या चोरीछुपके कारभाराबाबत आयुक्तांना पत्र पाठवून हायस्पीड रेल्वे स्टेशन परिसरातील बिझनेस पार्कला हरकत घेतली आहे.