
मतदारराजाने मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही बोटावर शाईच लावली जात नसल्याचा धक्कादायक प्रकार पनवेलच्या रोडपाली भागात समोर आला आहे. केवळ स्केच पेनाने खूण केली जात असल्याचा आरोप काही मतदारांनी केला आहे. उल्हासनगर व कल्याण-डोंबिवलीतही बोटावर लावलेली शाई पुसली जात होती. यावरून मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. मात्र प्रशासनाने थातूरमातूर उत्तरे देत वेळ मारून नेल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, बोगस मतदान वाढावे म्हणून तर हा सर्व घोळ केला नाही ना, असा सवाल विचारला जात आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील रोडपाली येथील बालाजी शाळेतील मतदान केंद्रात मतदान केल्यानंतरही बोटावर शाई लावली जात नव्हती. याचा जाब विचारल्यानंतर केवळ एका स्केच पेनाने खूण केली जात असल्याचा आरोप महिला मतदाराने केला आहे. इतकेच नाही तर याच भागातील महाराष्ट्र शाळेतही १७ ते १८ बोगस मतदार पकडून दिल्याचे सांगत विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. अशाच पद्धतीने बोगस मतदान घ्यायचे असेल तर सत्ताधारी उमेदवारांना मतदानाचा फार्स करण्याऐवजी थेट विजयी करा अशा शब्दांत सुनावले आहे.
साबणाने हात धुताच शाई गायब
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील प्रभाग सातमध्ये अजबच प्रकार समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर आणि त्यांची पत्नी ज्योती घाणेकर यांनी मतदान केल्यानंतर अवघ्या तासाभरात त्यांच्या बोटावर लावलेली शाई साबण लावताच गेल्याचे या दाम्पत्याने सांगितले. विशेष म्हणजे मतदान केंद्र शोधतानाही त्यांची फरफट झाल्याचे घाणेकर यांनी सांगितले. उल्हासनगरमध्येही प्रभाग १८ मध्ये मतदारांच्या बोटावर लावलेली शाई काही वेळातच पुसली जात असल्याने गोंधळ उडाला. या प्रकारामुळे मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, काही मतदारांनी पुन्हा मतदान करण्याची शक्यता व्यक्त केली आहे.






























































