देवगड, रत्नागिरी, अलिबाग, केरळी, कर्नाटकी, तामीळ; हापूसचा ‘पत्ता’ कोणता एका मिनिटात कळणार, एपीएमसीत येणाऱ्या आंब्यावर लेबल लावण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
AI Generated Image

हवामानात झालेल्या बदलामुळे यंदा आंब्याचे उत्पादन कमी झाले असल्याने विक्रेत्यांकडून कोकण हापूसच्या नावाखाली परराज्यातील आंबा विकला जात आहे. परिणामी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी एपीएमएसी मार्केटमध्ये येणाऱ्या आंब्यावर लेबल लावण्यात यावे, या लेबलमध्ये हा आंबा देवगड, रत्नागिरी, अलिबाग, केरळ, कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र प्रदेशमधून आला असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी कोकणातील शेतकऱ्यांनी एपीएमसी प्रशासनाकडे केली आहे. जर आंब्याच्या पेटीवर लेबल लागले तर हापूसचा पत्ता ग्राहकांना कळणार असून तो राज्यातील की परराज्यातील हे एका मिनिटात ओळखता येणार आहे, असे शेतकऱ्यांनी एपीएमसी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

कोकणातील वातावरण यंदा सुरुवातीला हापूससाठी पोषक होते. मात्र परतीच्या पावसाचा वाढलेला मुक्काम, मध्यंतरी थंडीने मारलेली दडी आणि अचानक पडलेला अवकाळी पाऊस याचा हापूसच्या सर्वच मोहोरांना मोठा फटका बसला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मोहोराचा फारच कमी आंबा झाडांवर लागला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा फक्त १० ते २० टक्के आंब्याचे उत्पादन अपेक्षित आहे. कोकण हापूसची आवक घटल्यामुळे अन्य राज्यातील आंबा कोकण हापूस म्हणून विकण्याचा धडाका विक्रेत्यांनी लावला आहे. हापूसमध्ये होत असलेल्या या भेसळीमुळे ग्राहकांची मोठी फसवणूक होत आहे. ते पैसे कोकण हापूसचे देतात, पण त्यांच्या माथी परराज्यातील आंबा मारला जात आहे. ही फसवणूक आणि कोकण हापूसमध्ये होत असलेली भेसळ थांबवण्यासाठी एपीएमसीत येणाऱ्या आंब्यावर लेबल लावण्याची मागणी कोकणातील शेतकऱ्यांनी एपीएमसीचे सचिव शरद जरे यांच्याकडे केली आहे, असे महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी सांगितले.

ग्राहक वाढले, मार्केट गजबजले

कोकण हापूसचा हंगाम सुरू झाल्यापासून आज प्रथमच नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये ग्राहकांची संख्या वाढली. त्यामुळे नेहमी शांत असलेले मार्केट आज गजबजून गेले. कोकणातील आलेला आंबा हातोहात विकला गेला. यापूर्वी व्यापाऱ्यांना ग्राहकांची वाट पाहावी लागत होती. येत्या १० ते १५ एप्रिलनंतर कोकणातील हापूसची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार असून ती ५० ते ५५ हजार पेट्यांच्या आसपास जाणार आहे, अशी प्रतिक्रिया फळ मार्केटमधील व्यापारी बाळकृष्ण शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

  • कोकणमधून हापूसच्या आज ३३ हजार ८६४ पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये आल्या. परराज्यातील आंब्याची आवक २१ हजार १०१ पेट्या इतकी राहिली.
  • आवक वाढल्यामुळे आंब्याचे दर कमी झाले आहेत. दोन हजार ते साडेचार हजार रुपये दर पेटीला मिळाला आहे. कोकण हापूसच्या तुलनेत परराज्यातील आंबाचा दर जवळपास निम्म्याने कमी आहे.
  • आखातात सुरू असलेल्या युद्धामुळे हापूसची निर्यात पूर्णपणे थांबली आहे. अमेरिकेत हापूसच्या दोन खेपा हवाईमार्गे गेल्या आहेत. मात्र या वाहतुकीचा खर्च जास्त असल्याने निर्यातीला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.