
ठाण्याच्या वर्तक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला साठ वर्षं पूर्ण झाली असून यंदा उत्सवाचे हिरक महोत्सवी वर्ष आहे. या भागातील काही मराठी तरुणांनी एकत्र येत गणेशोत्सवाची सुरुवात केली. दरवर्षी मोठ्या उत्साहात परिसरातील नागरिक एकत्र येत मोठ्या भक्तिभावाने गणेशाची स्थापना करत आहेत. आता तिसऱ्या पिढीने मंडळाचा कार्यभार उचलत आपली परंपरा जपली आहे.
औद्योगिक कामगारांसाठी वसवण्यात आलेले ठाण्याचे अण्णासाहेब वर्तक नगर सुरुवातीच्या काळात ३७ इमारती आणि छोट्याशा बैठ्या कॉलनी होत्या. १९६५ साली तिथे वासुदेव माने, भीमसेन चव्हाण, भास्कर मसुरकर, मो.ग. राव आदी मंडळींनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर रामदास राव, अप्पा राऊत, संतोष राऊत, नाना गरुडे, जयसिंग साटम यांनी त्याला बघता बघता भव्य स्वरूप प्राप्त करून दिले आहे. आज प्रशांत सातपुते, अभय अमृतकर, प्रतीक सातोस्कर, शशिकांत परब, वैशाली देशपांडे यांनी हा वारसा कायम राखत या नामांकित गणेशोत्सव मंडळाची साठ वर्षं इतकी दमदार वाटचाल पूर्ण होताना महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
मंडळांनी अनेक विघ्ने पार केली
वर्तक नगर ही कॉलनी गेली काही वर्षं पुनर्विकासाच्या प्रक्रियेतून जात असल्यामुळे इथले अनेक रहिवाशी कॉलनीतून इतरत्र राहायला गेले. त्यामुळे या गणेशोत्सवाचा निधी मोठ्या प्रमाणात आटला आहे. दरम्यान अनेक प्रकारची आर्थिक, सामाजिक, राजकीय विघ्ने आली, परंतु पुरेसे आर्थिक पाठबळ नसतानाही त्यावर मात करून या गणेशोत्सव मंडळाने साठ वर्षांचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. यंदा या गणेशोत्सव मंडळातर्फे डॉ. नचिकेत अमृतकर यांनी कॉलनीतील नागरिकांची दंतचिकित्सा करून सामाजिक बांधिलकी दाखवली.