Thane news – कोपरीत समाजकंटकांचा ‘रात्रीस खेळ चाले’, नऊ दुचाकी पेटवल्या

कोपरीत काही समाजकंटकांनी रात्रीस खेळ सुरू केला आहे. मोकळ्या मैदानात पार्क केलेल्या तब्बल नऊ दुचाकी अज्ञात इसमांनी पेटवल्याची ही घटना सोमवारी पहाटे चार ते सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत सर्व दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने त्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्थानिक कोपरी पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

कोपरीच्या गांधीनगर येथील मोकळ्या मैदानात लावलेल्या वाहनांना आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. तसेच स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून २० मिनिटांत आग नियंत्रणात आणली. या आगीच्या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी मैदानात उभ्या केलेल्या नऊ दुचाकी पूर्णपणे जळून नुकसान झाले आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोपरी पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही महिन्यात वाहने पेटवून देण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करूनदेखील समाजकंटकांवर कारवाई होत नसल्याने कोपरीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी तत्काळ अशा घटनांकडे लक्ष घालावे अशी मागणी करण्यात येत आहे.