वाहतूक शाखेला ‘लक्ष्मीदर्शन’, लोकअदालतीत एका दिवसात नऊ हजार खटले निकाली; 1 कोटी 38 लाखांचा दंड जमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय लोकअदालतीच्या निमित्ताने वाहतूक शाखेच्या तिजोरीला ‘लक्ष्मीदर्शन’ झाले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईचा दंड प्रलंबित ठेवणाऱ्या वाहनचालकांनी महसुलात भर टाकत ई-चलान दंडाचे ओझे हलके केले. ठाणे शहर वाहतूक शाखेच्या 18 युनिट अंतर्गत केलेल्या कारवाईत तब्बल 9 हजार 354 खटले निकाली काढले. यामध्ये एकूण 1 कोटी 38 लाख 53 हजार 300 इतका थकीत दंड वसूल करण्यात आला.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठोठावण्यात आलेला दंड न भरणाऱ्या वाहनचालकांवर खटला दाखल करण्यात येतो. अशी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रवींद्र पाजणकर यांच्या पुढाकाराने नुकतेच राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीत खटले निकाली काढले असून वाहनधारकांनी आपला थकीत दंड न्यायालयात जमा केला असल्याची माहिती वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

दंड भरणाऱ्यांना सवलत

वाहतूक पोलिसांकडून दंडाचे ई-चलान वाहनधारकांच्या मोबाईल वर पाठवले जाते. यात दंड भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांवर खटला दाखल केला जातो. अशी हजारो प्रलंबित प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्याची संधी दर तीन महिन्यांनी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये उपलब्ध केली जाते. त्यानुसार थकीत ई-चलान दंड भरणाऱ्या वाहनधारकांना सवलत देण्यात येते.