
दिवा रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी असल्यामुळे काही प्रवासी लोकल पकडण्यासाठी रेल्वे लाइनमध्ये उतरून उलट्या दिशेने डब्यात चढत आहेत. आज मेगाब्लॉक आणि साप्ताहिक सुट्टीमुळे लोकल पकडण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वे मार्गात उतरले होते. लोकल प्रवासासाठी प्रवाशांकडून होत असलेल्या या जीवघेण्या कसरतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या वर्षीच मुंब्रा ते दिवा रेल्वे स्थानकात लोकलमधून पडून काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता. गर्दीमुळेच अनेकांचा जीव गेलेला असताना दिवा रेल्वे स्थानकातील प्रवासी आपल्या जीवाचा, विचार न करता जीव धोक्यात घालत आहेत. दरम्यान रेल्वे प्रशासन तसेच रेल्वे सुरक्षा जवानांना न जुमानता उलट दिशेकडून लोकल पकडून सुरक्षिततेचे नियम तोडून हे प्रवासी प्रवास करत आहेत. त्यांच्यावर रेल्वे प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दिवा रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी असल्यामुळे काही प्रवासी लोकल पकडण्यासाठी रेल्वे लाइनमध्ये उतरून उलट्या दिशेने डब्यात चढत आहेत. लोकल प्रवासासाठी प्रवाशांकडून होत असलेल्या या जीवघेण्या कसरतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. pic.twitter.com/HWzZBHoHF0
— Saamana Online (@SaamanaOnline) February 2, 2026
लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा लोकल सुरू करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रवासी करत आहेत. कल्याण कर्जत परिसरात मोठ्या संख्येने नागरिक राहतात. त्यामुळे या मार्गावर लोकल फेऱ्या वाढवणे आवश्यक आहे.
ठाणे-कल्याण पाचवी आणि सहावी मार्गिका सुरू झाल्यानंतर लोकल फेऱ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली. मात्र पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तार होणे आवश्यक आहे. तसेच लोकल संख्या वाढवण्याची वारंवार मागणी केली असल्याची माहिती प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली.

























































