मुंबईतील बायोवेस्ट प्रकल्प अंबरनाथकरांवर लादण्याचा डाव, शिवसेनेचा कडाडून विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर येथील बायो-मेडिकल कचरा ज्वलन प्रकल्प अंबरनाथ एमआयडीसी परिसरात स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू असल्याने शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रदूषणकारक प्रकल्पाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कडाडून विरोध केला आहे. मुंबईतील बायोवेस्ट प्रकल्प अंबरनाथकरांवर लादण्याचा डाव हाणून पाडू असा इशारा शिवसेनेने राज्य शासनाला दिला आहे.

शिवसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख अनिल भोईर यांनी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, अंबरनाथमध्ये बायो-मेडिकल कचरा प्रकल्प होणार नाही असे सांगून सत्ताधारी आमदार बालाजी किणीकर अंबरनाथकरांना फसवत आहेत. प्रत्यक्षात आनंदनगर एमआयडीसी परिसरातील जांभिवली फेज 4 येथे संबंधित कंपनीला भूखंडाचे अधिकृत वितरण करण्यात आले असून त्या ठिकाणी प्रकल्पाचे बांधकामही सुरू आहे. आनंदनगर एमआयडीसी परिसरात आधीच रासायनिक उद्योगांमुळे प्रदूषणाने कळस गाठला आहे. त्यामुळे बायोवेस्ट प्रकल्प तत्काळ रद्द केला नाही तर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशाराही उपजिल्हाप्रमुख अनिल भोईर यांनी दिला आहे.

नागरिकांच्या जीवाशी खेळ

जांभिवली, जांभिवली पाडा, फणशीपाडा, ठाकूरपाडा, पाले तसेच चिखलोली व चिखलोली ठाकूरपाडा या गावांमध्ये हजारो कुटुंबे वास्तव्यास आहेत. अशा दाट लोकवस्तीच्या भागात बायो-मेडिकल कचरा ज्वलन प्रकल्प उभारणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. या प्रकल्पातून निघणारा विषारी धूर, घातक वायू आणि रसायने नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरणार आहे.