राडेबाजांच्या हातात ठाणे देणार काय? शिवसेनेच्या संजय घाडीगावकर यांचा सवाल

गेल्या दोन वर्षांपासून सुसंस्कृत ठाणे शहर आता राड्याचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. शिवसेनेशी गद्दारी करून मिंध्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर ठाण्यात गलिच्छ राजकारण सुरू झाले आहे. राडा करणे आपली संस्कृती नाही, त्यामुळे ठाणेकरांनो राडेबाजाच्या हातात तुम्ही शहर देणार आहात का, असा सवाल शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी उपस्थित केला आहे.

ठाण्याचा उत्तर प्रदेश, बिहार झाला असल्याची टीका सर्वत्र सुरू झाली असून यासाठी सत्ताधारीच जबाबदार आहेत. दरम्यान जे राजकारणी शहराचे वैभव बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या बाजूने सर्वसामान्य सुशिक्षित ठाणेकर उभे राहणार आहेत का, आज ते दुसऱ्यांच्या गाडीच्या काचा फोडतायत उद्या ते सर्वसामान्य नागरिकांच्या गाडीच्या काचा फोडायला मागेपुढे बघणार नाहीत. लोकशाहीत असली झुंडशाही ठाणेकर मान्य करणार आहेत काय, तुम्ही कोणत्याही विचारधारेचे असा, तुम्ही कोणालाही फॉलो करा.. मात्र जे लोक या ठाण्याचे नाव खराब करतायत, त्यांच्या बाजूने उभे राहू नका, असे आवाहन घाडीगावकर यांनी केले आहे.

शिवसेनाप्रमुखांचा राजकीय

ठाण्यावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जीवापाड प्रेम केले. काही समाजकंटकांनी दोन दिवसांपूर्वी ठाण्यात धिंगाणा घातला. त्याचं समर्थन राज्याचे मुख्यमंत्री करतात इतकी वाईट परिस्थिती या राज्यामध्ये याआधी कधी नव्हती. शिवसेना फोडणारे म्हणतात आम्ही हिंदुत्ववादी आहोत. पण ते आता भाजपवादी झाले आहेत. शिवसेनाप्रमुखांचे विचार आणि त्यांचा राजकीय वारसा ते कधीही संपवू शकणार नाहीत हे त्यांनी लक्षात ठेवावे.