मुख्यमंत्री फडणवीसांनी जास्तीत जास्त काळ ठाण्यात घालवावा अन्यथा ठाण्याचं बीड व्हायला वेळ लागणार नाही – संजय राऊत

ठाणे हे महाराष्ट्राचे महत्त्वाचे शहर आहे, हे शहर विकायला काढलंय अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जास्तीत जास्त काळ ठाण्यात घालवायला पाहिजे अन्यथा ठाण्याचं बीड व्हायला वेळ लागणार नाही असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ठाणे हे महाराष्ट्राचे महत्त्वाचे शहर आहे. शिवसेनेची पहिली सत्ता, भगवा झेंडा बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईच्या आधी ठाण्यावर फडकावला होता. काल मी ठाण्यात तलाव पाळी आणि उपवना जाऊन आलो. ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे, पण ठाणे हे सिमेंटचं जंगल करण्याचं काम सुरू आहे. पहावं तिथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. ठाणे विकायला काढलं आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी जास्तीत जास्त काळ ठाण्यात घालवायला पाहिजे नाही तर ठाण्याचं बीड व्हायला वेळ लागणार नाही. मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातल्या पोलिसांना सक्त सूचना दिल्या पाहिजेत की चूकीचे आदेश पाळायचे नाहीत.

दसरा मेळावा ही महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय आणि सांस्कृतिक भाग आहे. दसरा मेळाव्याची तयारी सुरू झाली आहे. पाऊस असो वा काही पण मेळावा होणार. आणि महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने शिवसैनिक आणि शिवप्रेमी जनता येईल. हा दसरा मेळावा यासाठी विशेष आहे की, दसरा मेळाव्यानंतर लगेचच मुंबईसह 27 महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. अशा पार्श्वभुमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राशी शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत असेही संजय राऊत म्हणाले.