
दिवाळी म्हटली की, फटाक्यांची आतषबाजी आलीच. मात्र यामुळे हवा आणि ध्वनी प्रदूषणाचे पुरते ‘दिवाळे’ निघाल्याचे समोर आले आहे. नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजनासह दिवाळीच्या चार दिवसांत ठाणे शहरात रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आल्याने हवेची गुणवत्ता ढासळली असून प्रदूषणाच्या पातळीमध्ये सरासरी ११.०१ टक्के वाढ झाली आहे. तर ध्वनी प्रदूषणातही ३.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पालिकेच्या प्रदूषण विभागाने आज जाहीर केले आहे.
मीरा-भाईंदरकरांचीही घुसमट
भाईंदर : मीरा-भाईंदरमध्येही हवेची गुणवत्ता दिवाळीत ३ दिवस खालावली आहे फटाक्यांमुळे शहरातील वायू प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढली आहे. गेल्या तीन दिवसांत हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ८१ वरून २०० च्या वर पोहोचला होता. शहराची हवा खराब श्रेणीत पोहोचली होती. परंतु मंगळवारी शहरात पाऊस पडल्यामुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. तर फटाक्यामुळे शहरात काही ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळेही प्रदूषण वाढले आहे. गेल्या २४ तासांत पीएम १० ची पातळी १०० वरून १६० पर्यंत वाढली तर पीएम २.५ ची पातळी ६० वरून ११० पर्यंत वाढली होती तर हवेची गुणवत्ता २०० पेक्षा जास्त खालावली होती.
- ठाण्यात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यामुळे फटाके वाजण्याच्या प्रमाणातही वाढ झालेली दिसून आली.
- संध्याकाळच्या वेळी झालेल्या पावसामुळे प्रदूषणापासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र २०२४ मध्ये दिवाळी कालावधीतील हवेच्या गुणवत्तेशी तुलना केली असता यंदा प्रदूषणाच्या पातळीत ७.२ टक्क्यांनी वाढ झाली झाली आहे.
- मागील ३ वर्षांच्या दिवाळीच्या कालावधीतील हवा प्रदूषणाचे मूल्यमापन केले असता २०२३ मध्ये हवेचा निर्देशांक ६२.६ टक्के होता तर २०२४ मध्ये ३३.९ टक्के वाढ झाल्याचे पालिकेने सांगितले.
हरीत फटाके फोडा
यंदा पावसामुळे शहरातील प्रदूषण काहीसे कमी झाले. मात्र पाऊस थांबताच धुलिकणात अचानक मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. पावसामुळे ठाण्यातील सरासरी हवेची गुणवत्ता निर्देशांक मध्यम पातळीवरच होता. मात्र दिवाळीत अचानक हवा दूषित झाली. ही धोकादायक स्थिती असून त्यावर मात करण्यासाठी हरित फटाके फोडण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी केले.




























































