Mumbai Hit And Run Case : माझी चूक झाली… ; घटनास्थळी नेताच आरोपी मिहीर शहाची रडारड

वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याने आपल्या कृत्याबद्दल पश्चाताप व्यक्त केला आहे. मिहीरने दारुच्या नशेत भरधाव कारखाली वरळीतील कावेरी नाखवा यांना निर्दयीपणे चिरडले होते. यानंतर तो फरार झाला होता. तीन दिवसांनी पोलिसांनी मिहीरच्या मुसक्या आवळल्या. पोलीस चौकशीत मिहीरने आपला गुन्हा कबूल केला आहे. ‘माझी चूक झाली, माझं करिअर उद्धवस्त झालं. माझ्या हातून घडलेल्या घटनेचा मला पश्चाताप होतोय’, असेही आरोपी मिहीरने पोलिसांना सांगितल्याचे म्हटले जात आहे.

मिहीरसह त्याचा चालक राजऋषी बिदावत याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना गुरुवारी घटनास्थळी नेऊन वरळीतील सीजे हाऊस ते सी लिंकपर्यंत हिट अँड रनचा सीन रिक्रिएट केला. तसेच आरोपींनी सांगितलेल्या आणखी काही गोष्टीही पोलीस पडताळून पाहत आहेत. घटनेनंतर मिहीर आधी प्रेयसीच्या घरी गेला. मग बहिणीसोबत बोरिवलीला गेला आणि त्यानंतर शहापूरला गेला. वरळी हिट अँड रन प्रकरणात नवनवीन माहिती आता समोर येत आहे.