
रेल्वे अपघातात रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास नुकसानभरपाईसाठी त्याच्या कुटुंबाला कोर्टाचे दार ठोठवायला लावू नका. रेल्वे प्रशासनाने अपघाताची तपासणी करून भरपाईची रक्कम वितरीत करावी, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
न्या. जितेंद्र जैन यांच्या एकल पीठाने हा निर्वाळा दिला आहे. स्वतःच्या कर्मचाऱ्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास रेल्वे प्रशासनाने त्याच्या कुटुंबाला भरपाईसाठी न्यायालयाच्या खस्ता खायला लावू नये. अपघाताच्या तपशिलाची पडताळणी करून रेल्वे प्रशासनाने संबंधित कुटुंबाला नुकसानभरपाईची रक्कम द्यावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले. भविष्यात रेल्वे कर्मचाऱ्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास त्याचे कुटुंब भरपाईसाठी न्यायालयात येता कामा नये, असेही न्या. जैन यांनी रेल्वे प्रशासनाला बजावले आहे.
रेल्वे कर्मचाऱ्याला मोफत प्रवासाची मुभा
रेल्वे प्रवाशाच्या मृतदेहाजवळ तिकीट सापडले नसल्याचा दावा प्रशासनाने केला तो न्यायालयाने फेटाळला. अपघाताच्या ठिकाणी तिकीट सापडले नसले तरी रेल्वे कर्मचाऱ्याला मोफत प्रवासाची मुभा असते तसा पास त्यांना दिला जातो. कदाचित हा पास घरी ठेवून प्रवास केला असेल किंवा हा पास घटनेच्या ठिकाणी सापडला नसेल, असे न्यायालयाने नमूद केले.
काय आहे प्रकरण
एका रेल्वे कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. गर्दीमुळे हा अपघात झाला. हा अपघात अनुचित घटनेच्या व्याख्येत मोडत नाही. या कर्मचाऱ्याकडे प्रवासाचे तिकीट नव्हते. त्यामुळे भरपाई देता येणार नाही, असा निकाल रेल्वे अपघात दावा प्राधिकरणाने दिला. याविरोधात या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाने याचिका दाखल केली होती.
पंच वैद्यकीय तज्ञ नसतात
रेल्वे अपघाताच्या पंचनामा वेळी उपस्थित असलेले पंच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ नसतात. ते घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

























































