
कोकणातील पारंपरिक नमन लोककलेला सध्या नवचैतन्य लाभले असून गावोगावी विविध कार्यक्रमांत या कलेची जोरदार मागणी वाढताना दिसत आहे. सार्वजनिक महापूजा, सत्यनारायण पूजन, लग्न समारंभ तसेच ग्रामदैवतांच्या जत्रांमध्ये नमन सादरीकरणाला प्राधान्य दिले जात असून रसिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे नमन कलेची ‘मनोरंजन एक्सप्रेस’ सध्या अक्षरशः सुसाट धावत असल्याचे चित्र आहे.
पूर्वापार चालत आलेली ही लोककला ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून जोपासली जात आहे. काळानुरूप या कलेत बदल झाले असले तरी तिचा गाभा आजही तितकाच जिवंत आहे. एकेकाळी वीज, स्पीकर किंवा रंगीत रोषणाईची सुविधा नसताना गॅसबत्तीच्या प्रकाशात नमन सादर केले जात असे. त्या वेळी लोक कंदीलाच्या उजेडात पाच-पाच किलोमीटर चालत जाऊन नमन पाहत, इतकी या कलेबद्दलची आत्मीयता होती. आज आधुनिक साधनसामग्रीमुळे सादरीकरण अधिक आकर्षक झाले असले, तरी रसिकांचे प्रेम मात्र तितकेच कायम आहे.
सध्या प्रत्येक तालुक्यात अनेक नमन मंडळे स्थापन झाली असून कलाकार आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सादरीकरण करत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. संगमेश्वर तालुकाही यामध्ये मागे नसून विविध मंडळांमार्फत दर्जेदार प्रयोग सादर होत आहेत. काही मंडळे सलग प्रयोग करत असून, दिवसभर कामधंदा करून किंवा शिक्षण पूर्ण करून रात्री नमन सादर करणारे कलाकार या कलेची खरी ओळख जपताना दिसतात.
नमन सादरीकरणात गण, गवळण, फार्स आणि वगनाट्य अशा विविध भागांचा समावेश असतो. विशेषतः गवळणीतील विनोदी संवाद, राधा-कृष्णाच्या कथा, तसेच वगनाट्यातील पौराणिक किंवा काल्पनिक कथांचे सादरीकरण रसिकांना खिळवून ठेवते. दिवसभराच्या कष्टानंतरही चेहऱ्यावर रंग लावून रंगमंचावर उभे राहणारे कलाकार आणि त्यांचे मनमोहक सादरीकरण हेच या कलेचे खरे वैशिष्ट्य ठरते.
रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात सध्या धार्मिक कार्यक्रम आणि जत्रांचा हंगाम सुरू असल्याने नमन कलेला मोठी मागणी निर्माण झाली आहे. शासनाकडूनही नमन महोत्सवांचे आयोजन करून कलावंतांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे या पारंपरिक लोककलेला नवसंजीवनी मिळत असून, नमन कलेचे सुवर्ण दिवस परतल्याची भावना व्यक्त होत आहे.
▪️मी पुर्वी नमन लोककलेचा आस्वाद घेतला आहे छान सादरीकरण करण्यात यायचं पण तेव्हा आतासारखी रंगीबेरंगी विद्युत रोषणाई नव्हती पण त्या कलेला प्रोत्साहन होते.आता काळ बदलला तशी आता अनेक साधनं उपलब्ध झाली आहेत मी शीव शंभो नमन मंडळ संगमेश्वर या कार्यक्रमात सहकलाकार म्हणून काम करत आहे, सकाळी शाळेत रात्री कोकणची लोककला सादर करतो जेव्हा आम्ही कलाकार रसिकांच्या समोर जातो तेव्हा रसिक टाळ्यांचा गजर करतों तेव्हा वाटतं की आपल्या लोककलेची लोकप्रियता वाढत आहे हे एक कलाकार म्हणून नक्कीच समाधान आहे.
श्लोक देवरुखकर ( नमन कलाकार )





























































