‘वर’ दोघे बसलेत त्यांचा बुलडोझर फिरेल! मिंध्यांची विधानसभेत विरोधकांना धमकी

दिल्लीच्या संपर्कात आल्याने एकनाथ शिंदे यांच्यात प्रचंड बदल झालाय. भाजपकडून देशात आणि राज्यात सुडाचे राजकारण सुरू असल्याची टीका अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विरोधकांनी केली होती. त्यावर उत्तर देताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, कॉँग्रेस नेते नाना पटोले यांना उद्देशून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर दोन जण बसलेत, त्यांचा बुलडोझर येईल’, अशी धमकीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा नामोल्लेख टाळत विरोधकांना दिली.

 राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना मविआमधील नेत्यांनी भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकण्याची योजना आखली होती, असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेकदा केला आहे. त्याचीच री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा ओढत ‘तुम्ही भाजपावर, एनडीए सरकारवर सुडाचं राजकारण केल्याचा आरोप करताय, मात्र सुडाचं राजकारण भाजपाने नव्हे तर महाविकास आघाडीतल्या लोकांनी त्यांच्या सत्ताकाळात केल्याचा आरोप विरोधकांवर केला. महाजन आणि फडणवीस यांना तुरुंगात टाकण्याच्या गोष्टी पडद्यामागे घडत होत्या. त्यावेळी मी आणि अजित पवार त्या लोकांना रोखू पाहत होतो. असं करू नका म्हणून सांगितलं होतं, परंतु, त्यांनी आमचं काही ऐकलं नाही. मी या लोकांना सांगायचो, वर (दिल्लीत) दोन जण (पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह) बसलेत, त्यांचा बुलडोझर येईल, असे सांगत भर विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांना इशारा दिला.

मुख्यमंत्र्यांचे भाषण भाजपसाठी हास्यजत्रा!

मुख्यमंत्री एवढं खोटं बोलत नव्हते. पण दिल्लीच्या सवयीमुळे त्याचं हे असं झालंय, असा टोला विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. राज्यपालांच्या भाषणावरच्या भाषणाची गाडी सुसाट होती, पण ट्रॅक सोडून चालली होती. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी शिंदे गटाचे सगळे लोक गंभीर होते, पण भाजपाचे लोक जोरात हसत होते. त्या भाषणाला हास्यजत्रेचं स्वरूप आलं होतं. इथून गाडी थेट नेहरूंपर्यंत घेऊन गेले. तिथून युक्रेन आणि रशियाच्या युद्धापर्यंत घेऊन गेले. जे मणिपूर शांत करू शकले नाहीत, त्यांच्या नावाने युक्रेन-रशिया युद्धबंदीपर्यंत ते गेले’, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी शिंदे यांचा समाचार घेतला.