आज रात्री प्रचार तोफा थंडावणार, उद्या मतदान; निवडणूक यंत्रणा सज्ज, बोगस मतदान रोखण्यास कार्यकर्तेही सतर्क

neta-leader

नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकाRसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यभरात सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उद्या रात्री 10 वाजता थंडावणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा आता सज्ज झाली आहे. तसेच संभाव्य बोगस मतदान रोखण्यासाठी सर्वच पक्षांचे कार्यकर्ते सतर्क झाले आहेत.

‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965’ मधील तरतुदींनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातात. उमेदवारी अर्ज अंतिम होऊन चिन्ह वाटप झाल्यानंतर राज्यभरात प्रचाराचा धुरळा उडाला होता. सर्वच राजकीय पक्षांनी आणि अपक्ष उमेदवारांनी आतापर्यंत जोरदार प्रचार केला आहे.

मतदानापूर्वीचा आजचा संडे तर प्रचारासाठी सुपर संडे ठरला. राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या राज्याच्या कानाकोपऱयात प्रचार सभा झाल्या. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या सभा राज्यभरात झाल्या. त्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. आता उद्याच्या शेवटच्या दिवशी बहुतांशी उमेदवार हे मतदारांच्या घरोघरी जाऊन मते मागण्यावर भर देण्याची शक्यता आहे.

उद्या रात्री 10 वाजल्यानंतर प्रचारसभा, मोर्चे आणि लाऊडस्पीकरचा वापर करण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारणही करता येणार नाही.

मार्गशीर्षला नमस्कार करून झडल्या संडे पाटर्य़ा

मतदारांना आमिष दाखवणे हा आचारसंहितेचा भंग असला तरी मतदानापूर्वीच्या आजच्या शेवटच्या संडेला गावागावांमध्ये पाटर्य़ा रंगल्या. इतके दिवस प्रचारासाठी जीवतोड मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्यांसाठी पक्षांनी आणि उमेदवारांनी पाटर्य़ांचे आयोजन केले होते. मार्गशीर्ष असल्याने अनेकांनी शाकाहाराचा आग्रह धरला, पण चिकन-मटणाचा झणझणीत वास आल्यानंतर मार्गशीर्षला नमस्कार करून अनेकांनी त्यावर ताव मारला. श्रमपरिहारासाठी ओल्या पाटर्य़ाही रंगल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.